औरंगाबाद - राज्यातील शेतकऱ्यांना फसवाल, तर याद राखा, तुमचे दुकान बंद करू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक विमा काढणाऱ्या विमा कंपन्यांना दिला. राज्यात लाखो शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून त्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याने शिवसेना आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उभी राहिली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात लासूर येथे शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांसाठी पीकविमा मदत केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांनी केले. उद्घाटन प्रसंगी औरंगाबादचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विनोद घोसाळकर यांची उपस्थिती होती.राज्यात शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नाही. अनेक चांगल्या योजना असतात, मात्र त्या योजना खालीपर्यंत जात नाहीत आणि त्याचे खापर सरकारवर फुटते. मुख्यमंत्र्यांची माझी मैत्री जगजाहीर आहे. मात्र, पीकविमा तक्रार संदर्भात मी शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेईन. आम्ही सरकारमध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहोत. राज्यातील पाहिले पीक विमा मदत केंद्र औरंगाबादेत सुरू केले याचा अभिमान आहे. ऐन पावसाळ्यात दौरा करत असल्याने अनेक जण टीका करत आहेत. मात्र, अद्याप पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नुसते बसून राहण्यापेक्षा काय स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.पीकविम्यात अनेक घोटाळे झाले, ते आता बाहेर येत आहेत. लोकांच्या हक्काचे पैसे घेऊन पळून गेलेत. मराठवाडा संतांची भूमी असली तरी ज्यांना सरळ भाषा कळत नसेल तर त्यांना आमची भाषा दाखवू, विमा काढणारा मल्या किंवा नीरव मोदी नाही, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फसवाल तर तुमची दुकाने बंद करू, मुंबईसह तुमची सर्वच कार्यालये बंद करू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी पीकविमा कंपन्यांना दिला. निवडणुका येतात निवडणुका जातात. मात्र, आपले नाते टिकू द्या, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या विधानसभेत साथ देण्याचे आवाहन जमलेल्या शेतकऱ्यांना कार्यक्रमाच्या निमित्ताने केले.