छत्रपती संभाजीनगर: आयुष संतोष पडवळ (वय १३) आणि शाहीद इरफान सय्यद (वय १८) (दोघेही राहणार डवाळा) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे डवाळा गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आयुष संतोष पडवळ हा बकऱ्या चारण्यासाठी डवाळा शिवारात गेला होता. बकऱ्या पाण्याच्या दिशेने गेल्याने आयुष तलावाकडे गेला असता पाय घसरुन पडला. त्याला वाचवण्यासाठी जवळच असलेल्या शाहिदने पाण्यात उडी टाकली.
गावात हळहळ व्यक्त: पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस घटनास्थळी पोहचली. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जलतरणपटू, ग्रामस्थ व पोलिसांनी दोघांना बाहेर काढले. मयत आयुष हा डवाळा येथील मुक्तानंद प्राथमिक विद्यालयाचा आठवीचा विद्यार्थी होता. तर शाहीद हा कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी कॉलेजचा विद्यार्थी होता. या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
बाप, लेकाचा तलावात बुडून मृत्यू: जालना शहरातील मोती तलाव परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या पाच जणापैकी एका १४ वर्षीय मुलासह बापाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी पाचच्या सुमारास ही घटना घडली. माणिक निर्वंळ व त्यांचा १४ वर्षाचा मुलगा आकाश निर्वंळ आपल्या तीन नातेवाईकासह मोती तलाव परिसरात पोहण्यासाठी आले होते. पोहत असताना आपला मुलगा बुडत असल्याचं पाहून माणिक निर्वंळ यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तलावात असलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने हे बाप- लेक बुडाले.
नागरिकांची घटनास्थळी गर्दी: घटनेची माहिती मिळताच चंदणझिरा पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन अग्निशमन विभागाच्या जवानाच्या मदतीने एक तासाच्या अथक परिश्रमानंतर पाण्यात गळ टाकून या बाप- लेकाचा शोध घेत मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. या घटनेने परिसरात एकाच हळहळ व्यक्त केली जात आहे. यापूर्वीही जिल्ह्यात अशा घटना घडल्या होत्या.
हेही वाचा: