औरंगाबाद - शरणापूर- दौलताबाद दरम्यान धावत्या रेल्वेखाली चिरडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. यामधील एका घटनेत तरुणाने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली. तर, दुसऱ्या घटनेत रेल्वेच्या दरवाज्यात बसलेल्या तरुणाचा हात निसटल्याने तो धावत्या रेल्वेखाली आला.
राहुल ज्ञानेश्वर नवले (वय 19, रा.पिशोर,ता.कन्नड.जि. औरंगाबाद) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर, मिलिंद गौतम भारसाखळे (वय 19, रा. शिंदीनगर, शोभानगर, चिकलठाणा) असे रेल्वे अपघातातील मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
मृत राहुल नवलेचे औरंगाबाद येथे शिक्षण सुरू असून तो काही दिवसांपूर्वी घरी पिशोरला गेला होता. आज तो चुलतीसोबत एसटी बसने औरंगाबादला आला. परीक्षेला जायचे कारण सांगत चुलतीला बोलून निघून गेला. मात्र, काही तासाने त्याने शरणापूर येथे धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली. राहुलने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.
दुसरी घटना ही शरणापूर जवळच घडली आहे. मृत मिलिंद चिकलठाणा येथील रहिवासी आहे. मुंबईतील लग्नसमारंभ आटोपून आई आणि मावस बहिणीसोबत ओरंगाबादला परतत होता. औरंगाबाद जवळ आल्याने दौलताबाद जवळील शरणापूर दरम्यान तो दरवाज्याजवळ येऊन उभा राहिला. त्याच वेळी त्याचा हात निसटला आणि तो खाली पडून धावत्या रेल्वेच्या चाकाखाली सापडला. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.