औरंगाबाद - नाशिकच्या ऑक्सिजन दुर्घटनेनंतर राज्यातील रुग्णालयांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि वैद्यकीय अधिष्ठाता कानन येळीकर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील ऑक्सिजन प्लँटची पाहणी केली. घाटी रुग्णालयात याअगोदर 15 क्यूबिक लिटर ऑक्सिजन क्षमता असणारे टॅंक बसवण्यात आले होते. आता आणखी दोन टॅंक बसवण्यात आले असून ते लवकरच कार्यान्वित केले जातील, त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा होणार नाही. तसेच या ऑक्सिजन टँकवर दोन टेक्निशियन कायम हजर असतात, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
अशी राबवली जाते प्रक्रिया -
टँकर आणि लिक्विड ऑक्सिजन टॅंक यांच्यात एक होस पाईप लावला जातो. त्यानंतर टँकरमधून टॅंकमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरले जाते. हे भरत असताना विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांच्या केवळ टॉप सिलिंग वॉलमधून ऑक्सिजन भरले तर प्रेशर कमी होण्याची शक्यता निर्माण होते. परिणामी रुग्णांपर्यंत होणारा ऑक्सिजन पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामध्ये प्रेशर असते त्यामुळे वॉल वेगाने उघडला गेला तर दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. टँकरद्वारे ऑक्सिजन भरत असताना त्याचा प्रेशर योग्य प्रमाणात असणे गरजेचे आहे. ऑक्सिजन टँकला एक टॉप सिलिंग वॉल असतो आणि दुसरा बॉटम सिलिंग वॉल असतो. टॉप सिलिंग वॉलमधून ऑक्सिजन भरताना टँकरचे प्रेशर कमी होते. तर, बॉटम म्हणून भरताना प्रेशर वाढते, त्यामुळे दोघांचा समतोल राखून ऑक्सिजन भरावे लागते. टॅंकमध्ये ऑक्सिजन भरून झाल्यावर वेपराईजपर्यंत पोहोचते. तिथून ऑक्सिजन गॅस तयार होतो. त्यानंतर रेग्युलेटर व प्रेशर नियंत्रित करून ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांपर्यंत केला जातो.
ऑक्सिजन भरण्याची जबाबदारी पार पाडतात टँकर चालक -
ऑक्सिजन टँकरमधून ऑक्सिजन टॅंकमध्ये भरण्याची जबाबदारी टँकरचालकाकडे असते. त्यासाठी टँकर चालकांचे प्रशिक्षण घेण्यात येते. त्यामुळे रिफिलिंग करण्याची पूर्ण जबाबदारी त्यांची असते. प्रशिक्षण नसलेल्या व्यक्तीने हे काम करणे अयोग्य आहे. घाटी रुग्णालयकडे दोन टेक्निशियन आहेत. ते चोवीस तास उपलब्ध असतात. रिफिलिंग कसे चालते यावर ते पूर्ण लक्ष ठेवत असल्याची माहिती प्राणवायू समितीचे कार्यकारी प्रमुख डॉ. अमोल जोशी यांनी दिली आहे.
रुग्णालयाचे होणार आता ऑक्सिजन ऑडिट -
शहराला प्राप्त होणाऱ्या ऑक्सिजनचे ऑडिट करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. या कामासाठी एक पथक सुद्धा नेमण्यात आले आहे. हे पथक शासकीय तसेच खासगी दवाखान्यांना भेट देऊन तेथील ऑक्सिजनच्या स्थितीचा आढावा घेणार आहेत. शहरातील दवाखान्यांमधील उपलब्ध ऑक्सिजनचे नियोजन करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महानगरपालिकेला दिली आहे. दवाखान्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचे ऑडिट करून आवश्यक ती उपाययोजना करण्याचे आदेश पालिकेला देण्यात आले आहेत. त्यानुसार आता शहरात प्रत्येक रुग्णालयाचे ऑक्सिजन ऑडिटकरून ऑक्सिजनबाबत योग्य नियोजन करणार असल्याचेपालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.