गंगापूर (औरंगाबाद) : शहराजवळील जाकमाथा येथील शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक १४ फेब्रुवारी घडली आहे. सुनीता राजीव कनोजी (१४) रा. झापडी व किरण कैलास जाधव (१३) रा. पिसणावल ता. शेंदवा जि. बडवानी ( मध्यप्रदेश ) असे मृत मुलींचे नाव आहे. दोघीं नात्याने एकमेकींच्या आते बहिणी आहेत.
फाटकवरून चढून शेततळ्यात उतरले
जाकमाथा येथील शेतकरी दिलीप पचपिंड यांच्याकडे मध्यप्रदेश येथील अनेक कुटुंब शेतात मजुरी करण्यासाठी आलेले आहेत. त्यातच कनोजी व जाधव कुटुंब येथे वैजापूरहुन दोनच दिवसांपूर्वी आले होते. मयत सुनीता, किरण व किरणचा लहान भाऊ राहुल हे पचपिंड यांच्या शेततळ्यात सकाळी अंघोळीसाठी सोबत गेले होते. शेततळ्याच्या कंपाउंड आहे व फाटकाला कुलूप असल्याने हे तिघे फाटकवरून चढून शेततळ्यात उतरले.
अंदाजच आला नाही
दोघींनाही पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्या बुडायला लागल्याने राहुल कुटुंबियांकडे पळत आला व किरण व सुनीता बुडत असल्याचे सांगितले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. दोघींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी करून मृतदेह कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक चौरे हे करत आहेत.