औरंगाबाद - कोरोना पॉझिटिव्ह असलेले २ कैदी कोविड केअर सेंटर मधून पळाल्याची खळबळजनक घटना रविवारी रात्री समोर आली आहे. शहरातील किलेअर्क येथील कोविड सेंटरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अक्रम खान गयास खान आणि सय्यद सैफ सय्यद असद असे पळून गेलेल्या कैद्यांची नावे आहेत. हे दोघेही हर्सूल कारागृहातील कैदी आहेत.
शनिवारी औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातील 29 कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याच निष्पन्न झाले होते. या कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याने इतरांना त्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या कैद्यांना शहरातील किलेअर्क येथील शासकीय वसतिगृहात असलेल्या कोविड सेंटरमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले. मात्र रविवारी रात्री 12 च्या सुमारास अक्रम खान गयास खान आणि सय्यद सैफ सय्यद असद यांनी बाथरूमचे कारण देऊन दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये प्रवेश केला. तिथे जाऊन दोघांनीही बाथरूच्या ग्रीलच्या काचा काढून तिथून उडीमारून पळ काढला.
ही घटना घडली त्यावेळी कारागृहाचे पोलीस कर्मचारी मुख्य दारावर पहारा देत होते. तसेच इमारतीत अन्य रुग्ण असताना देखील या कैद्यांनी पलायन केलेले कोणाच्या निदर्शनास कसे आले नाही? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. हे दोन कैदी पळून जात असताना काही युवकांच्या नजरेत आले होते. त्यांनी त्यावेळी पोलिसांना याबाबत संशय व्यक्त केला होता. मात्र पोलिसांनी याबाबत गंभीर्याने दखल घेतली नाही. या प्रकरणी कारागृह उपनिरीक्षकाच्या तक्रारी वरून बेगमपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.