औरंगाबाद : शहरातील घाटी रुग्णालयातील बालरोग विभागाच्या ३३ खाटांच्या वॉर्डमध्ये तब्बल ५८ बालके उपचार घेत आहेत. त्यातच येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे सलाईन, व्हेंटिलेटर लावून एकाच खाटेवर दोन बालकांवर उपचार केले जात आहेत. या संपूर्ण प्रकारचा व्हिडिओ एका रुग्णाच्या नातेवाईकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे.
घाटी रुग्णालयावर ताण
शहरात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडल्याने वातावरणात बदल झाला आहे. परिणामी रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात ताप, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. अचानक रुंग्णसंख्या वाढल्याने घाटी रुग्णालयावर ताण पडला आहे. त्यामुळे बालरोग विभागाच्या ३३ खाटांच्या वॉर्डमध्ये तब्बल ५८ बालके सलाईन, व्हेंटिलेटरवर आहेत. परिणामी बालरोग विभागात एकच बेडवर दोन बालकांना उपचार घ्यावा लागत आहे. तसा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यात एकाच खाटेवर दोन बालकांवर उपचार केले जात आहेत.
रिकाम्या वॉर्डमध्ये रुग्ण शिफ्ट करण्याची मागणी
घाटी रुग्णालयात रिकाम्या वॉर्डमध्ये वाढलेल्या रुग्णांना शिफ्ट करण्याची मागणी रुग्णांचे नातेवाईक करत आहेत. यामुळे डॉक्टरांवर ताण पडणार नाही. तसेच रुग्णांना योग्य उपचार वेळेत मिळतील. यासाठी प्रशासनाने रुग्ण नसलेल्या वॉर्डमध्ये रुग्णांना उपचारासाठी व्यवस्था करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकारामुळे घाटी प्रशासन आतातरी दखल घेणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा - मेकॅनिकल इंजिनिअरची हत्या, चौघे आरोपी गजाआड