औरंगाबाद - बिडकीनचे ग्रामसेवक संजय शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी पैठणचे गटविकास अधिकारी विजय लोंढे यांचा पदभार काढल्यानंतर आता ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष सखाराम दिवटे, विस्ताराधिकारी भास्कर साळवे आणि ग्रामसेवक तुळशीराम पोतदार यांचे निलंबन केले आहे.
संजय शिंदे यांनी केली होती आत्महत्या -.
बिडकीन ग्रामपंचायत तपासणी करत असताना मानसिक त्रास देत पाच लाखांची मागणी केल्याने ग्रामसेवक संजय शिंदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांची पत्नी प्रतिभा शिंदे यांनी केला होता. याची तक्रार बिडकीन पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीत पैठण गटविकास अधिकारी विजय लोंढे, ग्रामविकास अधिकारी सखाराम दिवटे, विस्ताराधिकारी भास्कर साळवे आणि चितेगावचे ग्रामसेवक तुळशीराम पोतदार यांच्यावर आरोप करण्यात आले होते.
पुढील आठ दिवसात होणार चौकशी -
ग्रामसेवक संजय शिंदे यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा धक्कादायक आरोप झाल्यानंतर राज्य ग्रामसेवक युनियनने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. संपूर्ण प्रकरणाची चौकशी पुढील आठ दिवसात पूर्ण करावी. आरोप असलेल्या चौघांचीही चौकशी करून त्याचा अहवाल तयार करण्यात यावा. अहवाल ग्रामविकास विभागाच्या सचिवाकडे पाठवण्यात येईल आणि त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. ग्रामविकास विभागाकडून याप्रकरणी विचारणा झाली असल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कवडे यांनी सांगितले.
पैठण पंचायत समितीत होईल चौकशी -
आत्महत्या प्रकरणी आरोप झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगेश गोंदावले यांनी गट विकास अधिकारी विजय लोंढे यांच्याजागी सहाय्यक गटविकास अधिकारी के एम बागुल यांच्याकडे कार्यभार सोपवला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून 27 जानेवारीला पैठण पंचायत समिती येथे याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. ग्राम सेवक, विस्तार अधिकारी सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासनाधिकारी, वरिष्ठ सहाय्यक यांनी आवश्यक त्या पुराव्यासह हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.