औरंगाबाद - कोरोना विषाणूबाबत भीती बाळगण्याचे कारण नाही. पुण्यातील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून हे दाम्पत्य ज्या लोकांना भेटले आहे त्या लोकांचीही तपासणी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
पुण्याचे कोरोनाग्रस्त दाम्पत्य एका टुरींग कंपनीमार्फत चाळीस लोकांसोबत दुबईला गेले होते. दुबईमध्ये त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता आहे. ज्या चाळीस लोकांसोबत हे दाम्पत्य गेले होते त्या सर्वांचे नमुने घेऊन तपासणी करण्याचे काम सुरू आहे. पुण्यातील या दाम्पत्याला नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचे उपचार स्वतंत्र कक्षात केले जात आहेत.
हेही वाचा - दुबईहून पुण्यात परतलेल्या दांपत्याला कोरोनाची लागण, देशभरात एकूण 47 रुग्ण
दरम्यान, सरकार कोरोनाला गांभिर्याने घेतले आहे. राज्यात सर्वच रुग्णालयात याबाबत यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी जनजागृती करण्याबाबत सरकार उपाय योजना करत आहे. राज्यात मास्क आणि इतर साधन सामग्री उपलब्ध करण्याबाबत सरकार पाऊल उचलत आहेत. कोरोनाला घाबरून न जाता त्यापासून काळजी घ्यावी, असे आवाहन राजेश टोपे यांनी केले.
हेही वाचा - पुण्याच्या प्रसिद्ध रुग्णालयाच्या मेडिकलमधून 100 मास्क चोरीला; एकाला अटक
काही दिवसांपासून लोक कोरोनाबाबत अफवा पसरवत आहेत. औषधांच्या नावाने आयुर्वेद औषध देऊन लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही टोपे यांनी केले आहे.