औरंगाबाद - मोबाईलच्या दुकानातून भर दिवसा चोरट्याने व्यापाऱ्याची पैशांची बॅग पळवल्याची घटना सिल्लोड शहरात घडली आहे. या घटनेत व्यापाऱ्याचे 1 लाख 5 हजार रुपये रोख, 5 हजार रुपये किमतीचा एक मोबाईल आणि महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
सिल्लोड शहरातील भगतसिंग चौकात श्री राजकुमार धनश्यामदास कटारिया यांच्या मालकीचे साईबाबा लाईट हाऊस हे मोबाईलचे दुकान आहे. आज(30नोव्हेंबर) सकाळी साडे दहाच्या सुमारास कटारिया नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले. यावेळी त्यांनी त्यांच्या हातातील दोन बॅग दुकानात ठेवल्या. काही कामानिमित्त कटारिया शेजारच्या दुकानात गेले असता चोरट्याने एक बॅग पळविली.
हेही वाच - औरंगबादमध्ये थकबाकीमुळे महावितरणने केला महापालिकांच्या शाळांचा वीज पुरवठा खंडित
आपली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली. मात्र, आरोपीने तेथून पळ काढला. यानंतर कटारिया यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात सर्व घटना कैद झाली होती. कटारिया यांनी घटनेची माहिती त्वरित पोलिसांना दिली. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज नुसार आरोपी दुकान उघण्याआधीच दुकानासमोर बराच वेळ उभा होता. दुकान उघडताच आरोपीने रोख रक्कम असलेली बॅग लंपास केली. व्यापारी राजकुमार कटारिया यांच्या तक्रारीवरून सिल्लोड पोलीस ठण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.