औरंगाबाद - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे, खबरदारीचे उपाय म्हणून 29 एप्रिलपासून संचारबंदी अधिक कडक केली जाणार आहे. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी आता सकाळी सात ते अकरा याच कालावधीत नागरिकांना बाहेर पडता येणार आहे.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी संचारबंदीबाबतचे नवीन आदेश काढले आहेत. त्यानुसार सकाळी सात ते अकरा या काळापुरतं संचारबंदीत काही सूट देण्यात येणार आहे. सकाळी अकरानंतर औषधी दुकान वगळता कुठलेही व्यवहार सुरू ठेवता येणार नाहीत, असं या आदेशात म्हटले आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये गेल्या दोन दिवसात कोरोनाचे 53 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख तसेच पालकमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध लागू करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार आता शहरात संचारबंदी कायदा अधिक कडक करण्यात आला आहे. सकाळी सात ते दुपारी एक या कालावधीत संचारबंदीत थोडी शिथिलता देण्यात आली होती. जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी या काळात नागरिकांनी बाहेर पडावं असं सांगण्यात आलं होतं. मात्र, करोनाचे वाढते रुग्ण पाहता ही वेळ आता कमी करण्यात आली आहे. इतकचं नाही तर रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांना फळ विकत घेण्यासाठी दुपारी तीन ते पाच या कालावधीत काही ठिकाणी फळांची दुकानं सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र, ती परवानगी देखील आता रद्द करण्यात आली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात जे काही साहित्य उपवास सोडण्यासाठी लागतं ते मुस्लिम बांधवांनी सकाळी अकराच्या आधीच घेऊन टाकावे, अशा सूचना पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिल्या आहेत.