औरंगाबाद - कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदला शहरी आणि ग्रामीण भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनाच माहिती नसल्याचे समोर आले. पुरुष शेतकऱ्यांना आंदोलनाच्या मागण्या माहिती नव्हत्या. मात्र, महिला शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव मिळावा इतकी माहिती असल्याचे दिसून आले.
आंदोलन कश्यासाठी हे माहीत नाही, पण मागण्या योग्य
दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला राज्यात पाठिंबा देण्यासाठी बंद पाळण्यात आला. या बंदला शहर आणि ग्रामीण दोन्ही भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हा बंद होता. त्या शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहेत. ते कशासाठी आंदोलन करत आहेत. याबाबत औरंगाबादच्या जटवाडा भागातील शेतकऱ्यांना विचारल्यास ते म्हणाले, शेतकरी आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत इतकी माहिती नाही. मात्र, शेतकरी चुकीच्या मागण्या करत नाहीत त्यांच्या मागण्या योग्य असतील म्हणून ते मागील बारा दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यामुळे आमचा पाठिंबा आहे, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
इतर साहित्य छापील दरावर, तर शेतीमाल का नाही?
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाबाबत पुरुष शेतकऱ्यांना जास्त माहिती नसली तरी महिला शेतकऱ्यांनी मात्र आंदोलनाच समर्थन देत, शेती मालाला हमीभाव मिळाला पाहिजे आणि त्या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. बाजारात मिळणारे तेल, मीठ, तिखट विकत घेताना छापील किंमतीवर विकत घेतले जाते. तर शेतकऱ्यांनी पिकवलेला माल त्याला योग्य आणि स्थिर भाव का नसावा? तो असलाच पाहिजे म्हणून आमचा बंदला पाठिंबा आहे,असे मत महिला शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
हेही वाचा - शेत वस्तीवर राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी केला अत्याचार
हेही वाचा - कोरोनाबाधित रुग्णांचा रुग्णालयात राडा; डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला