औरंगाबाद - मुख्यमंत्र्यांना आरक्षणाबद्दल काही कळत नाही, मुळात शिवसेनेचा आरक्षणाला विरोधच होता, अशी टीका विनायक मेटे यांनी केली आहे. औरंगाबादेत झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यव्यापी बैठकीत ते बोलत होते.
बैठकीत विनायक मेटे यांनी मराठा समाजात फाटाफूट असल्याचा आरोप केला. एखाद्याला पद मिळत असेल तर त्याचा विरोध न करता आपल्या माणसाला काहीतरी मिळत याचा आनंद व्यक्त केला पाहिजे. सरकार फक्त एखाद्याच्या मागचे डोके बघते, त्यानंतर राजकारणात किंमत ठरते, असे मत मेटे यांनी व्यक्त केले. श्रीमंत मराठे आंदोलनात उतरत नसून बीडमध्ये मराठा समाजानेच मला पाडले. ओबीसी नेते समजासाठी बोलतात परंतु एक ही मराठा आमदार समाजाच्या बाजूने बोलत नाही, असा आरोप बैठकीत मेटे यांनी केला. तसेच संभाजी राजे यांनी राजीनामा देऊन समाजासाठी काम करावे, अशी मागणी बैठकीचे आयोजक रमेश केरे पाटील यांनी केली. आमचा राजेंना विरोध नाही. त्यांनी खासदारकीची राजीनामा देऊन यापुढे राजकारण करणार नाही असे आश्वासन द्यावे, फक्त समाजासाठी काम करेल, असे आश्वस्त केले तर सर्वच संघटना त्यांच्या सोबत राहतील, असे केरे पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले.
राज्यस्तरीय बैठकीतील संमत करण्यात आलेले ठराव
- सर्वोच्च न्यायालयात 27 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणाची सुनावणी आहे. स्थगिती नाही उठली तर नंतर आंदोलन उभारणार
- मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना सेवा सवलती देण्यात याव्या.
- मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका करणाऱ्या च्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार.
- मशाल क्रांती मोर्चा काढणार
- मराठा समाजाच्या संस्था चालकांनी 10 टक्के आरक्षण मराठा बांधवांसाठी द्यावे, अन्यथा आंदोलन करणार.
- स्थगिती न उठल्यास केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात काळी दिवाळी साजरी करणार.
- आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राने कायदा करावा.
- हिवाळी अधिवेशनात मराठा समाज दिल्लीत आंदोलन करणार.
- राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा घ्यावा असे ठराव बैठकीत घेण्यात आले.