औरंगाबाद - लॉकडाऊनच्या काळात औरंगाबादमध्ये सकाळचे सात तास नागरिकांना आपली कामे करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. मात्र, या काळात नागरिकांनी आपली वाहने रस्त्यावर आणल्यास कारवाई होणार आहे, असे आदेश पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दिले आहेत. नागरिकांनी आवश्यक वस्तूंची खरेदी आपल्या घराजवळील दुकानातच करावी. विनाकारण रस्त्यांवर गर्दी करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
औरंगाबादेत रोज बाराशे ते चौदाशे वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईमधून आत्तापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे. मात्र, लॉकडाऊनच्या काळात जर अत्यावश्यक कामे करण्यासाठी वेळ दिली आहे तर मग या काळात दंड का वसूल केला जात आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सहा दिवस शहर पूर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर 21 मे पासून सकाळी सहा ते एक या काळात नागरिकांना आपली कामे करण्यासाठी वेळ देण्यात आली आहे. मात्र, या काळात बाहेर पडलेल्या नागरिकांची वाहन पोलीस अडवत आहेत. त्यांच्याकडे वाहनांची कागदपत्रे, वाहन चालवण्याचा परवाना तपासणीचे कारण देत वाहने जप्त केली जात आहेत. सोबतच त्यांच्याकडून दंडही वसूल केला जात आहे. या कारवाईने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.
यावर पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी नागरिकांनी आपली वाहनेच बाहेर काढू नये, असा सल्ला नागरिकांना दिला आहे. आपल्याला आवश्यक असलेले साहित्य आपल्या घराजवळ असलेल्या दुकानातून घ्यावे. रस्त्यावर वाहनांची गर्दी केली तर पोलीस कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठीच पोलीस कारवाई करत आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
मात्र, वाहने आणली नाही तर साहित्य घेऊन जाणार कसे? प्रत्येक सामान घराजवळ मिळेलच असे नाही आणि मिळाले तरी ते वाजवी दरात मिळेल याची खात्री नाही. त्यामुळे नियम शिथिल असलेल्या वेळेत कारवाई करू नये, अशी विनंती नागरिकांकडून केली जात आहे.