औरंगाबाद- २० टक्के अनुदान असणाऱ्या शाळांना पूर्ण अनुदान मिळावे यासाठी औरंगाबादेत शिक्षकांनी बेमुद्दत आंदोलन पुकारले आहे. यादरम्यान शिक्षकांनी शनिवारी फुगे फुगवा आंदोलन केले. सरकार नुसत्या फुगव्या घोषणा करते त्यामुळे शिक्षकांनी फुगे फुगवून सरकारचा निषेध केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्राथमिक, माध्यमिक आणि उच्चमध्यमिक विनाअनुदानित शाळेतील शिक्षक आंदोलन करत आहे. मात्र सरकार न्याय द्यायला तयार नसल्याने शिक्षकांनी बंद पुकारला आहे. त्यामुळे सोमवारपासून शाळा बंद असणार आहे. इतकेच नव्हे तर सरकारने याबाबत आपली भूमिका जाहीर न केल्यास मंगळवारी शहरात मुख्यमंत्र्यांची यत्रा येणार आहे. ती यात्रा आम्ही अडवू असा इशारा आंदोलक शिक्षकांनी दिला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून शिक्षक संघटनांनी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या १८ वर्षांपासून राज्यातील ४५०० मराठी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमधील जवळपास ४८००० शिक्षक आणि कर्मचारी विनावेतन काम करत आहे. अनेक वेळा आंदोलन करूनही शाळांना अनुदान मिळत नाही. त्यामुळे शिक्षकांना वेतन मिळत नाही. परिणामी शिक्षक आक्रमक झाले आहेत. सरकार आंदोलनाची दाखल घेत नसल्याने सोमवार पासून शाळा बंद ठेवणार असल्याची घोषणा, आंदोलक शिक्षकांनी केली आहे.