औरंगाबाद - बीड बायपास रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी स्पीडगनने वाहनांची वेग मर्यादा मोजण्याचे काम वाहतूक पोलिसांकडून सुरू असतानाच शहरातील मध्यवस्तीत भरधाव टँकरने कामावरून घरी जाणाऱ्या ३२ वर्षीय सेल्समनला चिरडल्याची घटना शनिवारी दुपारी शहरातील समर्थनगर भागात घडली. अपघातानंतर चालक टँकर घेऊन पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
सय्यद सोहेलोद्दीन सय्यद शफीउद्दीन वय ३२ (रा. बारापूल्लागेट, मिलकॉर्नर) असे अपघातात ठार झालेल्या सेल्समन तरुणाचे नाव आहे. मृत सोहेल हा एका खाजगी कंपनीत सेल्समन म्हणून कामाला होता. काम आटोपून तो दुपारी जेवण करण्यासाठी त्याच्या (एम एच २० ई व्ही ५०२६) या दुचाकीवरून घरी जात असताना समर्थनगर भागात पोहोचताच पाठीमागून आलेल्या (एम एच २० एफ ६८२२) भरधाव टँकरने सोहेलच्या दुचाकीला धडक दिली. व सोहेल अपघातात जागीच ठार झाला.
अपघात झाल्याचे पाहून टँकर चालकाने टँकरसह घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये टँकर कैद झाला आहे. या प्रकरणी क्रांतिचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस टँकर व चालकाचा शोध घेत आहे.