छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : आंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजेश भोसले यांनी सलग 36 तास पोहत जल साक्षर मोहीम राबवली. आजही अनेकांना पोहता येत नसल्याने त्यांचे प्राण जातात. त्यामुळे पोहणे किती महत्वाचे आहेत, त्याचे फायदे काय आहेत याबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचे ते म्हणाले. या आधी सोळा तास, चोवीस तास आणि आता 36 तासांचा उपक्रम घेण्यात आला. आता यापुढे 60 तास पोहण्याचा उपक्रम हाती घेणार असल्याचे राजेश भोसले यांनी सांगितले.
जलसाक्षरता वाढवण्यासाठी प्रयत्न : जलसाक्षरता ही काळाची गरज झाली आहे. काही मुलांना पोहता येत नाही, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ते स्वतःचे संरक्षण करू शकत नाहीत. गेल्या काही वर्षात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. जलसाक्षरता निर्माण झाली तर निश्चित अनेकांचे प्राण वाचू शकतात. म्हणून आंतरराष्ट्रीय जलतरणपटू राजेश भोसले यांनी 36 तास पोहण्याचा आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला. 14 जून रोजी पहाटे पाच वाजता त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली. 15 जून सायंकाळी पाच वाजता त्यांनी आपलं ध्येय गाठत पोहण्याचे 36 तास पूर्ण केले. यातून पोहण्याचे महत्त्व लोकांना पटवून देता येईल, असे मत राजेश भोसले यांनी व्यक्त केले.
पर्यावरण बचावासाठी कार्य केले : आंतरराष्ट्रीय जलतरणपटू राजेश भोसले यांनी वेगवेगळ्या माध्यमातून विक्रम प्रस्थापित केले आहेत. या आधी त्यांनी 15 तास, 18 तास आणि 24 तास पोहत जलसाक्षरता केली आहे. इतकंच नाही तर पर्यावरण बचावासाठी त्यांनी मोहीम हाती घेतली आहे. अनेक ठिकाणी पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांच्यातर्फे वृक्ष दान केले जाते. त्याचबरोबर त्यांचे संगोपन किती महत्त्वाचे आहे, याबाबत माहिती देखील देण्यात येते. आत्तापर्यंत त्यांनी हजारो वृक्ष भेट स्वरूपात दिले आहेत. तर अनेक ठिकाणी वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन देखील त्यांनी यशस्वीरीत्या केले आहे. आपण निसर्गाच देणं लागतो आणि ते आपण पूर्ण केलं पाहिजे, त्यामुळेच जलसाक्षरतेसोबतच पर्यावरण बचावच काम देखील आपण करतो, असे मत भोसले यांनी व्यक्त केले.
रोज करावा लागतो सराव : आंतरराष्ट्रीय जलतरणपटू राजेश भोसले यांनी नुकतेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशासाठी दोन सुवर्णपदक जिंकली आहेत. यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आहेत. रोज सकाळी चार तास आणि रात्री तीन तास ते पोहण्याचा सराव करतात. देशासाठी खेळण्याचा मान मला मिळाला आहे. अजून वेगवेगळ्या स्वरूपात देश हिताचे काम करण्याची इच्छा असून जलसाक्षर मोहीम पुढे चालू ठेवण्यासाठी पुढील काही वर्षात सलग साठ तास पोहण्याचा निश्चय केला आहे, असे राजेश भोसले यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा :