औरंगाबाद - स्पर्धा परीक्षा बंद असल्याने विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडको परिसरात घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आकाश दत्तराव अडकीने असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. तसेच स्पर्धा परिक्षेच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर काही परिक्षा रद्द झाल्या. परिक्षा होत नसल्याच्या तणावामुळेच तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे.
आकाश अभियंता असून मुळचा नांदेडचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून आकाश औरंगाबादमध्ये स्पर्धा परिक्षांची तयार करत होता. औरंगाबादेत तो त्याच्या भावासोबत राहात होता. बुधवारी त्याचा भाऊ आणि भावजाय कामानिमित्त मुंबईला गेले होते. यामुळे आकाश घरी एकटाच होता. गुरुवारी रात्री उशिरा त्याचा भाऊ आणि भावजय मुंबईहून घरी परतले, तेव्हा आकाश त्याच्या खोलीत झोपलेला होता. त्यामुळे त्याला न उठवता ते स्वतःच्या खोलीत जाऊन झोपले.
अभ्यासिकेत गेला नाही
सकाळी आकाश अभ्यासिकेला गेला नाही.त्यामुळे त्याला उठवण्यासाठी भाऊ त्याच्या खोलीत गेला असता, आकाशने छताच्या हुकाला दोरी बांधून गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. या घटनेची माहिती त्यांनी लगेच सिडको पोलिसांना कळविली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आकाशला घाटीत दाखल केले डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी सिडको ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - कशाला आलात, मी सांगितले होते येऊ नका! अण्णांनी फडणवीस, विखेंना सुनावले