औरंगाबाद - राज्यात बोगस बियाणांवरून विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होत असून थेट कारवाई होत आहे. मात्र ही कारवाई चुकीची असल्याचा आरोप करत महाराष्ट्र फर्टीलायझर्स, पेस्टीसाईडस्, सीडस् डिलर्स असोसिएशने १० ते १२ जुलै दरम्यान राज्यव्यापी बंद पुकारला आहे.
शेतकऱ्यांना बोगस बियाणं दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल केल्याने विक्रेत्यांमध्ये संताप आहे. बियाणे विक्रेत्यांवर होणारी कारवाई अन्यायकारक असून सरकारने विक्रेत्यांवर दाखल केलेले गुन्हे ताबडतोब मागे घ्यावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
आम्ही शासनाने प्रमाणित केले बियाणे विक्री करतो. त्यामुळे बोगस बियाणांसंदर्भात उत्पादक कंपन्यांची चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली. महाराष्ट्र शासनाने मागण्या मान्य न केल्यास पुढील काळात बेमुदत बंद पुकारणार, असा इशारा महाराष्ट्र फर्टीलायझर व सीडस् असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी दिला आहे.