औरंगाबाद - कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी शासन आणि प्रशासन सज्ज आहे. मराठवाड्याच्या औरंगाबाद जिल्ह्यात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने हा आजार पसरू नये यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वसमावेशक ‘टास्क फोर्स’ची स्थापना करुन सुक्ष्म नियोजनाव्दारे रुग्ण संख्येवर नियंत्रण मिळवावे. अशा सूचना सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादमधे दिल्या.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत औरंगाबादमधे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील खासदार, आमदार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांचा समावेश होता. दरम्यान राजेश टोपे यांनी किलेअर्क परिसरातील अलगीकरण केंद्राला भेट दिली. येथील रुग्णांशी त्यांनी संवाद साधला तर, काही भागात जाऊन तेथील नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आरोग्यमंत्री टोपे यांनी जिल्ह्यात वाढत चाललेल्या रुगणसंख्या आणि त्यावर करण्यात येत असलेल्या उपाययोजनांविषयी आढावा घेतला. कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी स्वतंत्र खाजगी रुग्णालयाची अथवा वार्डची निर्मिती करावी जेणेकरुन त्यांची अधिक चांगल्या प्रकारे काळजी घेता येईल, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच घाटीमध्ये केवळ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करावेत. नॉन कोव्हीड रुग्ण खाजगी रुग्णालयात भरती करावेत. जे खाजगी रुग्णालय रुग्णांना भरती करुन घेण्यास टाळाटाळ करतील त्यांची मान्यता रद्द करण्यात यावी. तसेच ज्या बाधित रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत त्यांच्यावर आयुष मंत्रालयाच्या निर्देशानुसार उपचार करण्याच्या सुचना देखील टोपे यांनी बैठकीत दिल्या.