औरंगाबाद - कोळसा तुटवडा निर्माण झाल्याने वीज भारनियमन करण्याची वेळ आली असल्याचे बोलले जात असले तरी केंद्राकडे पुरेसा कोळसा होता. मात्र, राज्य सरकारने तो घेण्यास असमर्थता दर्शवली, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे म्हणाले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मराठवाडा रेल्वे विभागाची आढावा बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.
राज्य सरकार आता कोळसा घ्यायला तयार -
पावसाळ्यात कोळसा खदाणीत पाणी साचते. त्यामुळे आधीच कोळशाचा साठा करून ठेवणे गरजेचे असते. केंद्र सरकारने तो साठा करून ठेवत राज्य सरकारला साठा करण्याबाबत विचारले. मात्र, त्यावेळी त्यांनी असमर्थता दर्शवली. शेती करताना पावसाळा सुरू होण्याआधी तसे पेरणीचे साहित्य घेऊन ठेवतात. तसे करावे लागते. केंद्राने जास्त साठा करून ठेवला. त्याला आग लागू शकते, अशी भीती असते. मात्र, आता राज्य सरकार कोळसा घ्यायला तयार आहे, समस्या सुटेल अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.
हेही वाचा - पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करणार - राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर
रेल्वेचा विस्तार करण्याबाबत उपाय योजना -
राज्यातील रेल्वे विकास करण्याबाबत करारानुसार 50 टक्के वाटा राज्य सरकारचा असावा त्याबाबत लवकरच बैठक होईल. समृद्धी महामार्ग नागपूर मुंबईला रेल्वे मार्ग बाबत पाहणी सुरू केली, राज्य सरकार सकारात्मक असेल तर तो प्रकल्प पूर्ण करू, मालगाडीबाबत दिल्लीपासून सर्व ठिकाणी फक्त मालगाडी जाईल, अशी पटरी टाकण्याचा प्रयत्न आहे. तसेच देशात रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. राज्याने वाटा मिळाला नाही म्हणून काम थांबणार नाही, असेही मंत्री दानवे पत्रकार परिषदेत म्हणाले.