औरंगाबाद- जटवाडा भागातील शरदचंद्र पवार दिव्यांग मुलांच्या शाळेत एक घाणेरडा प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील एका व्हिडिओत दिव्यांग मुलामुलींना निर्वस्त्र करून एकत्र अंघोळ घालत असल्याचे दिसून आले आहे. समाज कल्याण विभागाच्या निरीक्षकांनी केलेल्या पाहणीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुख्यध्यापकासह व्यवस्थापनाविरुद्ध हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरदचंद्र पवार दिव्यांग मुलांच्या शाळेत १ ते १७ वयोगटातील ३० ते ३५ विद्यार्थी आहेत. समाज कल्याण निरीक्षक एस.डी. साळुंके यांनी या विद्यालयाला भेट दिली होती. त्यावेळी शाळेत सर्व विद्यार्थी नग्न अवस्थेत बसलेले आढळून आले. इतकेच नव्हे तर, मुला-मुलींना एकत्र अंघोळ घालत असल्याचेही दिसून आले. याबाबतची माहिती विभागाला देण्यासाठी व्हिडिओ तयार करण्यात आला. त्यात केयर टेकर याला विचारले असता, याच पद्धतीने रोज अंघोळ घातली जात असल्याची धक्कादायक कबुली त्याने दिली आहे.
व्हिडिओ १३ मार्च २०२० ला बनवण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू होती आणि आता समाज कल्याण निरीक्षक यांच्या तक्रारीनंतर शाळेच्या मुख्याध्यापकासह व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण १३ आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, नियमानुसार शाळेत काहीही दिसले नाह. साधा गार्डसुद्धा शाळेत नव्हता, तर मुलांना दिले जाणारे अन्नसुद्धा पुरेशा प्रमाणात आढळले नाही. सरकारी मदतीवर ही शाळा चालते, तरीसुद्धा असले दुर्दैवी प्रकार इथे पाहायला मिळाले आहेत. याप्रकरणी दिव्यांग व्यक्ती हक्कभंग अधिनियम २०१६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हर्सूल पोलीस करत आहे.