औरंगाबाद : कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्याच्या मनगुत्ती गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटनेमुळे महाराष्ट्र-कर्नाटकसह अनेक ठिकाणी शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. औरंगाबादच्या सिल्लोड येथे या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली, या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने सिल्लोड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करण्यात आला. कर्नाटकाचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला.
बेळगाव जिल्ह्यातील येथे छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवण्यावरून शिवप्रेमीमध्ये संताप व्यक्त होताना दिसत आहे. कर्नाटकातील मनगुत्ती गावातील छत्रपतींचा पुतळा हटविण्यासाठी तेथील सरकार कारणीभूत आहे. गेल्या पंधरा दिवसापूर्वीही भाजपचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी थेट सभागृहात छत्रपतींच्या घोषणेचा विरोध दर्शविल्याने भाजप सरकार छत्रपतींच्या नावावर केवळ राजकारणाची पोळी भाजत असल्याचे जनतेच्या लक्षात आले आहे. या घटनेसाठी शिवसेना शांत बसणार नाही. कर्नाटकातील भाजप सरकारने मनगुत्ती गावात पुन्हा सन्मानपूर्वक छत्रपतींच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल, नगरसेवक विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, राजू गौर, शिवसेना तालुका उपप्रमुख रघुनाथ घरमोडे, डॉ. दत्ता भवर, संतोष धाडगे, युवासेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, धैर्यशील तायडे, यांच्यासह गौरव सहारे, माजी नगरसेवक सुशील गोसावी, शेख इम्रान (गुड्डू), संजय मुटकुटे, रवी गायकवाड, गणेश डकले, लखन ठाकूर, बाळू पचोरी, आनंद सिरसाट, सतीश शिरसाट आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.