औरंगाबाद - इंडिका कारमधून 9 बॉक्स अवैध दारु विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या दोघांना सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून पकडले. ही कारवाई शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घाटनांद्रा येथील बस थांब्याजवळ करण्यात आली. पोलिसांनी इंडिका कारसह दारुचे बॉक्स जप्त करत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला.
श्रीरंग राघोबा सिरसाठ (वय 21), मुश्ताक शगीर पटेल (वय 19) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पोलीस गस्त घालत होते. यावेळी पांढऱ्या रंगाच्या इंडिका कारमधून दारुचे बॉक्स आमठाणाकडे नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी घाटनांद्रा येथील बस थांब्याजवळ सापळा रचला. याच दरम्यान इंडिका कार थांबवून पोलिसांनी कारची झडती घेतली. यावेळी 26 हजार रुपये किमतीची 9 बॉक्स दारु आढळून आली.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत इंडिका कार व दारुचे बॉक्स जप्त केले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार देविदास जाधव, काकासाहेब सोनवणे, सचिन सोनार यांनी केली. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरु असल्याने दारुची दुकाने बंद आहेत. परंतु, दारु विक्रेते अवैधरित्या दारुची वाहतूक व विक्री करीत आहेत. तर लॉकडाऊनमध्येही पोलिसांची अवैध धंदे करणाऱ्यांवर करडी नजर आहे.