छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : गेल्या महिन्याभरापासून अधिकमास सोमवार आणि श्रावण सुरू झालाय. त्यामुळं घृष्णेश्वर मंदिरात भक्त मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत आहेत. दर्शनासाठी मंदिर प्रशासनानं योग्य ती काळजी घेतली आहे. इतकंच नाही तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दिवसभरात पन्नास हजाराहून अधिक भक्त दर्शन घेतील, असा विश्वास मंदिरातील सेवक गोविंद शेवाळे यांनी व्यक्त केलाय.
नवसाला पावणारे देवस्थान अशी आख्यायिका : महादेवाचे देशभरात 12 ज्योतिर्लिंग महत्वाचे मानले आहेत. त्यात प्रत्येक मंदिराचं वेगवेगळं वैशिष्ट पाहायला मिळतं. सर्वात शेवटचं ज्योतिर्लिंग वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिर मानलं जातं. या मंदिराचं वैशिष्ट म्हणजे पहिले अकरा ज्योतिर्लिंग उत्तरामुखी आहेत, तर घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग पूर्वाभिमुख आहे. 'प्रत्येकाची मनोकामना पूर्ण करणारा आणि नवसाला पावणारा' घृष्णेश्वर महादेव, अशी या मंदिराची आख्यायिका आहे. देशभरात अकरा ज्योतिर्लिंगांची यात्रा केल्यानंतर जोपर्यंत बाराव्या घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन घेत नाही, तोपर्यंत यात्रा पूर्ण होत नाही, अशी आख्यायिका आहे. त्यामुळं देशभरात यात्रा करणारा प्रत्येक भक्त हा घृष्णेश्वर मंदिरात दर्शन घ्यायला येत असतो. तर दरवर्षी महाशिवरात्रीला मोठ्या संख्येनं भक्त दरवर्षी घृष्णेश्वर मंदिरात दाखल होतात. ते आपली मनोकामना मागून भगवान शंकराचा जयघोष करत असतात.
रात्रीपासून भाविकांची गर्दी : श्रावणी सोमवारनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी मंदिर परिसरात दाखल होतात. मध्यरात्री बारा वाजल्यापासून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. मंदिरात दर्शन घेण्यासाठी काही नियमावली लावून देण्यात आलीय. त्यामध्ये पुरुषांना दर्शन घेताना कमरेवरील वस्त्र काढावं लागतं. कमरेवरील तांब्याचा बेल्ट देखील काढून ठेवून दर्शन घ्यावं लागतं. मंदिराच्या गाभाऱ्यात दोन वेगवेगळ्या भागांमध्ये महिला आणि पुरुषांना दर्शन घेत आहे. थेट महादेवाच्या पिंडीपर्यंत जाऊन भक्तांना दर्शन मिळतं. स्थानिक ग्रामस्थांची गैरसोय होऊ नये, याकरिता त्यांच्यासाठी विशेष वेळ निर्धारित करून दिली जाते. बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था, उपवास असल्याने पाणी आणि फराळाची सोय केली जाते.
लाल रंगाच्या दगडातील बांधकाम : घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराचं बांधकाम लाल दगडात करण्यात आलं आहे. त्यावरील नक्षीकाम सर्वांना आकर्षित करतं. वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ असलेलं हे पवित्र धार्मिक स्थळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी 16 व्या शतकात मंदिराचा प्रथम जीर्णोद्धार केला होता. त्यानंतर मल्हारराव होळकर यांच्या पत्नी गौतमीबाई यांनी 1730 मध्ये मंदिराचं बांधकाम केलं. ते आजही तसंच आहे. त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी पुन्हा एकदा जीर्णोद्धार केल्याची इतिहासात नोंद आहे, अशी माहिती मंदिर सेवक गोविंद शेवाळे यांनी दिलीय.
हेही वाचा :
- Shravan 2023: श्रावणी सोमवारनिमित्त भीमाशंकर मंदिरात भक्तांची गर्दी, पाहा मंदिराला आकर्षक फुलांची सजावट
- Shravan 2023: 'कलश शोभा यात्रा' काढून उत्साहात श्रावण महिन्याचे स्वागत, महादेवाला रुद्र अभिषेक
- Shravan Somwar 2023 : आज पहिला श्रावण सोमवार; आजच्या दिवशी शिवमूठ वाहण्याचे महत्त्व आणि कारण जाणून घ्या...