औरंगाबाद - जिल्हा परिषद आरोग्य विभागात कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असून ग्रामीण भागातील उपकेंद्रे ओस पडली आहेत. तसेच २९ डॉक्टर गैरहजर असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देण्याची घोषणा केली असली तरीही प्रत्यक्षात मात्र अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही.
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात एकूण १ हजार २५ पैकी केवळ ७७४ पदे भरलेली आहेत. तर अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून खाजगी दवाखान्याची मात्र चांदी होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत १०९ आरोग्य अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत, यापैकी केवळ ८२ आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत, यातील काही डॉक्टर शैक्षणिक सुट्टीवर आहेत. तर काही महिला डॉक्टर प्रसूती रजेवर आणि काही विना परवानगीने सुट्टीवर आहेत. त्यामुळे सध्या जिल्ह्यात २९ डॉक्टर गैरहजर असल्याची माहिती आहे.
याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील रुग्णसेवेवर झालेला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये जिल्हा माता बालसंगोपन एक पद, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी एक पद, तालुका आरोग्य अधिकारी एक पद, वैद्यकीय अधिकारी गट ३८ पदे, वैद्यकीय अधिकारी गट एक पद, आरोग्य सेवक पुरुष १०६ पदे, आरोग्य सेवक सहाय्यक पुरुष १६८ पदे, आरोग्य सेवक महिला १०, औषध निर्माण अधिकारी ४ अशी अनेक पदे रिक्त असल्याने याचा परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर झाला असून आरोग्य सेवा पूर्णपणे कोलमडली आहे.