औरंगाबाद - राज्यातील शेतकरी परतीच्या पावसाने अडचणीत असताना सत्ता स्थापनेचे स्वप्न पाहणे चुकीचे आहे, असे टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केली. तसेच सरकारने शेतकऱ्यांना दिलेली 10 हजार कोटींची मदत तुटपुंजी आहे. त्यांना तातडीच्या मदतीची गरज असल्याने कुठलीही आडकाठी न करता हेक्टरी 25 हजारांची मदत देण्याची मागणीही उद्धव यांनी केली. ही रक्कम थेट या शेतकऱ्यांच्या हातात जावी, असेही त्यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी उद्धव यांनी केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली.
उद्धव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टिका केली. परतीचा पाऊस जाताना म्हणतोय "मी पुन्हा येईन" मात्र, त्याची भीती लोकांना बसली आहे. सध्या शेतकरी अडचणीत असताना सरकार स्थापन करण्याच्या स्वप्नात असू तर हे बरोबर नाही. असे सांगत त्यांनी सत्ता स्थापनेबाबत असणाऱ्या चर्चेचे गूढ कायम ठेवले.
पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकार सोमवारी आरसीव्हीपी या करारावर स्वाक्षरी करणार आहे. मिळालेल्या माहिती नुसार दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आयात करताना त्यावर आयात शुल्क नसेल. त्यामुळे या कराराच्या अटी व शर्ती जाहीर कराव्या. तसेच हा करार देशाच्या हिताचा आहे का नाही हे कळले पाहिजे. त्यामुळे या कराराबाबत केंद्र सरकारने माहिती द्यावी, अशी मागणीही उद्धव यांनी करत केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे.
उद्धव पुढे म्हणाले, राज्यात मोठी आपत्ती आली आहे. बऱ्याच वर्षानंतर ओल्या दुष्काळाची परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. म्हणून हेक्टरी 25 हजार रुपये देण्याचीही मागणीही त्यांनी सरकारला केली आहे. शेतकरी आणि शिवसेनेची यंत्रणा एकत्र करून काम करणार त्यांना मदत करणार आहे, असेही ते म्हणाले. तसेच प्रत्येकाचे नुकसान वेगवेगळे त्यादृष्टीन तातडीने रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पोहोचणे गरजेचे आहे. म्हणून सरकारने तातडीने ही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात द्यावी.
हेही वाचा - 'आमचं ठरलंय' या वाक्याने होऊ शकतो शिवसेनेचा घात? सेनेच्या वरिष्ठ नेत्याची खंत
तर 10 हजार कोटींची रक्कम ही फक्त सुरुवात आहे. राज्यातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर या परिस्थितीत सरकारी यंत्रणा काम करत आहेत ते पाहून समाधानी असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे, माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे -.
- निकष नंतर लावा... मात्र, आधी हेक्टरी २५ हजार शेतकऱ्यांना द्यावे
- केंद्र सरकारने देखील मदत करावी
- चिखलात अडकलेल्या बळीराजाला बाहेर काढू
- सत्तास्थापनेतील सहभागाबाबत आगामी काळात कळेल.
- सातबारा कोरा करणे हे माझे वचन
- मला शेतीतील काही कळत नाही तर फक्त शेतकऱ्याचे अश्रू दिसतात
- या परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांना नोटीस पाठवली तर गाठ शिवसेनेशी
- जनावरांचा चाराही उद्धवस्त
- आत्महत्या करून घर पोरकं करू नका
- शिवसेना बळीराजाच्या पाठीशी
- राज्यात इतरही ठिकाणी भेट देणार
- या ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांच्या तोंडाचा घास हिरावला
- परिस्थितीवर मात करणे अत्यंत महत्त्वाचे
- 10 हजार कोटींत काहीही होणार नाही
- शासकीय यंत्रणा शेतकऱ्याच्या दारी जाण्यासाठी शिवसेना मदत करणार
- विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईल त्यांना दाखवणार