औरंगाबाद - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या अत्याचारातील पीडितेला शिवसेना तसेच वंचित बहुजन आघाडीकडून शनिवारी (दि. 3 ऑक्टोबर) क्रांती चौक येथे श्रद्धांजली वाहत आंदोलन करण्यात आले. यावेळी दोन्ही पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यावेळी उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या शासनावर प्रश्न निर्माण करण्यात आले. तसेच गुन्हेगारांना शासन देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने पाऊले उचलावी. पीडितेने आरोपींची नावे सांगितली आहेत त्यांना फाशी व्हावी, अंत्यसंस्कारासाठी पीडितेचा मृतदेह कुटुंबाला न देता परस्पर अंत्यसंस्कार केला गेला. नेमके उत्तर प्रदेश सरकारला यातून काय स्पष्ट करायचे आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यावेळी लता बामणे, लता झोम्बडे, वंदना नरवडे, सुनंदा खाडे, अश्विनी आरक यांच्या सह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
त्यानंतर शिवसेना औरंगाबादच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यात तरुणींसह महिलांची उपस्थिती मोठी होती. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध घोषणेबाजी करत, आंदोलनाला सुरुवात झाली. उत्तर प्रदेश सरकार राजकीय पक्षांसह पत्रकारांनाही हाथरस येथील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी सोडत नाहीत. भाजप सरकार हुकुमशाहीने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहे. पीडितेला तसेच तिच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. उत्तर प्रदेश सरकार बरखास्त केले पाहिजे, अशी मागणी शिवसैनिकांनी धरून ठेवली. यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे, संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, कला ओझा, सुनिता औलवार यांसह आदी उपस्थित होते.
हेही वाचा - कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्या - प्रवीण दरेकर