औरंगाबाद : शरद पवारांनी पत्रकार परिषदेत भाजपा आणि मोदी सरकारवर सडकून टीका केली. त्यावेळी बोलताना त्यांनी सत्ताधारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चांगलाच समाचार घेतला.
मोदी सरकारविरुद्ध जनमत तयार करण्याचा प्रयत्न करेन : 'आज देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्यांच्याकडून समाजामध्ये एकवाक्यता ठेवायची अपेक्षा होती. मात्र त्याऐवजी ते विभाजनाची भूमिका घेत आहेत. त्यामुळे आता यापुढे मोदी सरकारविरुद्ध जनमत तयार करण्याचा प्रयत्न केला जाईल', असे शरद पवार यावेळी म्हणाले. 'आम्ही देशपातळीवर दोन सभा घेतल्या. एक बिहारमध्ये आणि दुसरी कर्नाटकमध्ये. त्या सभेमध्ये सहा राज्यांचे मुख्यमंत्री, तसेच अनेक मोठे नेते आले. याला 'इंडिया' असे नाव देण्यात आले. 31 ऑगस्टला 'इंडिया'ची मुंबईत बैठक घेतली जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी जाहीर सभा होईल', असे शरद पवारांनी सांगितले.
भाजपावर सरकार पाडण्याचा आरोप : यावेळी बोलताना शरद पवारांनी भाजपावर विविध राज्यातील सरकार पाडण्याचा आरोप केला. 'भाजपाने गोव्यात सरकार पाडले. महाराष्ट्रातील उद्धव सरकारही पाडले. लोकनियुक्त सरकार पाडण्याचा कार्यक्रम मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने घेतला आहे', अशी जळजळीत टीका शरद पवारांनी यावेळी केली.
मणिपूरच्या मुद्यावरून खडे बोल सुनावले : शरद पवार यांनी मणिपूरच्या मुद्यावरून नरेंद्र मोदींना खडे बोल सुनावले. 'ईशान्य भारत संवेदनशील भाग आहे. तेथे ज्या काही घटना घडत आहेत, किंवा घडवल्या जात आहेत त्या धोकादायक आहेत. त्याबाबत नरेंद्र मोदी अविश्वास ठरावादरम्यान जास्त बोलले नाहीत. त्यांनी मुख्यत: विरोधकांवरच टीका केली. त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही', असे शरद पवार म्हणाले. 'मणिपूरमधील स्थिती चिंताजनक आहे. अशा वेळेस पंतप्रधानांनी तेथे जायला हवे. मात्र त्यांना ते महत्वाचे वाटले नाही. त्यापेक्षा जेथे निवडणुका होत आहेत तेथे जाणे त्यांना महत्वाचे वाटले. मणिपूरमध्ये मोदी सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे', अशी बोचरी टीका त्यांनी यावेळी केली.
मोदींनी फडणवीसांचा आदर्श घेतला : 15 ऑगस्टच्या भाषणातही नरेंद्र मोदी मणिपूरबाबत बोलतील अशी अपेक्षा होती. मात्र तेथेही ते याबाबत बोलले नाहीत, असे शरद पवार म्हणाले. मोदींनी फडणवीसांचा आदर्श घेतला आहे. त्यांनी लाल किल्यावरून फडणवीसांसारखे सांगितले की मी पुन्हा येईन. त्यांना मणिपूरची चिंता नाही, मात्र पुन्हा सरकार कसे येईल याची चिंता आहे, असा टोला शरद पवारांनी मोदींना लगावला.
हेही वाचा :