औरंगाबाद - सिडको, एन-3 भागातील ज्वेलरी दुकानाच्या सुरक्षारक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी चंदनाचे झाड तोडून नेल्याची घटना काल पहाटे घडली. याविषयी पुंडलिकनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - घाटी रुग्णालयातील यंत्रणा सज्ज; अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांची माहिती
काही दिवसांपासून केली होती रेकी..
सिडको भागातील दुकानासमोर एक चंदनाचे झाड अनेक वर्षांपासून होते. चंदनाच्या झाडावर चोरट्यांनी डोळा ठेवून रेकी केली. सोमवारी (२२ फेब्रुवारी) रात्रपाळीसाठी गजानन ढवळे आणि शिवकरण यादव हे दोन बंदूकधारी सुरक्षारक्षक तैनात होते. दरम्यान पहाटे ४ वाजेच्या सुमारास रस्त्यावर भाजीपाला विक्रेत्यांची वर्दळ सुरू होते यामुळे सुरक्षारक्षकांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या बंदूकी ठेवून दिल्या आणि ते दालनापुढे गप्पा मारत उभे होते. यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या सहा चोरट्यांनी सुरक्षारक्षकांना जागेवर पकडले व शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे तोंड बंद केले. यावेळी तिन्ही चोरट्यांनी अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत चंदनाचे झाड तोडले आणि खोडाचे तुकडे करून पोत्यात टाकून दुचाकीवरून मुकुंदवाडीच्या दिशेने सुसाट निघून गेले.
या घटनेबाबत दोन्ही सुरक्षारक्षकांनी पोलिसांना घटनेबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा - बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे काम 'जैसे थे' ठेवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश