औरंगाबाद - ऑलम्पिक खेळांची धूम सध्या पाहायला मिलत आहे. याच स्पर्धेत सहभागी होता, यावं यासाठी अनेक खेळाडू तयारी करत असतात. त्यात लहान शहरांमधील खेळाडूंना प्रशिक्षण मिळत नसल्याने त्यांना स्पर्धेत सहभाग घेणे अशक्य असल्याचं बोललं जातं. मात्र औरंगाबाद सारख्या मागास विभागातून साई केंद्राच्या माध्यमातून 2028 सालापर्यंत 10 ते 12 खेळाडू ऑलिम्पिकसाठी तयार होतील, असा विश्वास साईचे संचालक विरेंद्र भांडारकर यांनी व्यक्त केला आहे.
साई केंद्रात खेळाडूंना मिळत आहे प्रशिक्षण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात असलेल्या साई केंद्रात खेळाडूंना प्रशिक्षण दिले जात आहे. सध्या स्थितीत भारतात सर्वाधिक खेळांचे प्रशिक्षण देणारे केंद्र म्हणून औरंगाबाद साई केंद्राचे नाव घेतले जाते. बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, फेंसिंग, फुटबॉल, अर्चरी, अॅथलेटिक, हँडबॉल, हॉकी, जुडो, वेटलिफ्टिंग या खेळाचे प्रशिक्षण साई केंद्रात दिले जाते. चांगले खेळाडू निर्माण व्हावे, याकरिता केंद्र सरकारने कोट्यवधींची भरीव मदत दिली असून सर्वोत्तम साधन सामग्री खेळाडूंना प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती साईचे संचालक विरेंद्र भांडारकर यांनी दिली.
चांगले खेळाडू घडवण्याचा प्रयत्न
औरंगाबादचे साई क्रीडा प्रशिक्षण केंद्र भारतातील काही प्रमुख केंद्रांपैकी एक केंद्र मानले जाते. आज घडीला यात 125 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. साईमध्ये असलेल्या सुविधांमुळे चांगले खेळाडू घडवण्याचा प्रयत्न आहे. आधी नुसते प्रशिक्षण केंद्र म्हणून मान्यता असलेल्या या केंद्राचा दर्जा वाढवण्यात आला आहे. त्यामुळे 280 खेळाडूंची मान्यता देण्यात आली आहे. लवकरच पूर्ण क्षमतेने खेळाडूंना प्रशिक्षण देणे शक्य होईल आणि चांगले खेळाडू निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती साईचे संचालक यशवंत भांडारकर यांनी दिली.
नुकताच तयार करण्यात आला स्टीलचा स्विमिंग पूल
जगातील दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी साई केंद्र सज्ज होत आहे. डिसेंबर 2020 मध्ये साई येथे स्टीलचा स्विमिंग पूल तयार करण्यात आला. हा पूल तयार करत असताना जगातील पातळीच्या नियमावलींचे पालन करण्यात आले. तत्कालीन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते या पुलाचे उदघाटन करण्यात आले. स्विमिंग पुल सोबतच जिम देखील तयार करण्यात आली असून याठिकाणी जगातील पातळीचे जलतरणपटू घडवण्यात मदत होईल. यासाठी तशी तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती संचालक विरेंद्र भांडारकर यांनी दिली.
कोविडमुळे झाला परिणाम
साई प्रशिक्षण केंद्रात चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जागतिक दर्जाचे खेळाडूंना प्रशिक्षण सुरू करण्यात आले, मात्र मागील दीड वर्षांपासून कोविडमुळे निर्बंध आल्याने त्याचा परिणाम खेळावर झाला आहे. देशातील विविध भागांमधून खेळाडू प्रशिक्षणासाठी येऊ शकत नाहीत. त्यामुळे काही खेळांचे प्रशिक्षण देण्यावर परिणाम दिसून आला असला तरी लवकरच पूर्ण क्षमतेने सर्वच खेळांचे प्रशिक्षण सुरू होईल आणि 2028 ऑलिम्पिक पर्यंत चांगले खेळाडू साई केंद्रात घडतील, असा विश्वास संचालक विरेंद्र भांडारकर यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय थाळीफेकपटू कमलप्रीत कौरचा अंतिम फेरीत झोकात प्रवेश!
हेही वाचा - Tokyo Olympics : भाऊ.. लवलिनानं उपांत्य फेरी गाठताच पदक पक्कं केलं, पण सिंधूचं का झालं नाही?