औरंगाबाद - इंधन दरवाढीमुळे एसटीचा रोज दोन कोटींचा तोटा होतो. तो भार सोसणे अवघड आहे. त्यामुळे तिकीट दरवाढ करण्याचा पर्यायाबाबत विचार करत असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी औरंगाबादेत दिली.
एसटीचा तोटा कमी करण्यासाठी इतर पर्याय
मागील दीड वर्षांपासून एसटी तोट्यात आहे. तो तोटा कमी करण्यासाठी उत्पन्न वाढीचे अन्य पर्यायाचा शोध घेतला जात आहे. त्यात कार्गो सुविधांसारख्या सुविधा एसटीसह इतरांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अन्य पर्यायांबाबत त्याचा विचार सुरू असून त्याबाबत लवकरच उपाययोजना केली जाईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग नाही
एसटी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू होऊ शकत नाही. एसटीचा स्वतःचा वेतन करार होतो. महामंडळाचा वेगळा वेतन करार होतो. त्यामुळे यावर चर्चा करण्याचा प्रश्न उरत नाही, असे अनिल परब यांनी स्पष्ट केले. आमचा कुठलाही खाजगीकरणाचा प्रस्ताव नाही. आता साडेतीन हजार बसेस नियमबाह्य होणार आहेत. त्यामुळे काही खाजगी बस भाड्याने घेण्याचा प्रस्ताव आहे. आधीही असा प्रयोग राबवला आहे. एकही कर्मचारी कमी होणार नाही. त्याचबरोबर नवीन बस बांधणी आमच्या कार्यशाळेत केली जाईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.
माझी ईडीची चौकशी होणार नाही -
महाविकास आघाडीच्या नेत्यांविरुद्ध ईडीची होणारी कारवाई बाबत बोलताना माझी कुठलीही चौकशी झाली नाही आणि मी तसे काही केले नाही. भविष्यातही ती चौकशी होणार नाही. त्यामुळे त्याबाबत बोलणे योग्य नाही, असे म्हणत अनिल परब यांनी ईडी कारवाईबाबत बोलल्यास टाळले. इतकेच नाही तर मराठा समाजाच्या मुलांना नोकरीबाबत गृह विभागाने ज्यांची नाव दिले आहे, अशा नऊ जणांना नोकरी समावून घेण्यात आले आहे आणि इतर जी प्रक्रिया आहे तीदेखील राबवली जाईल अशी महिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.