औरंगाबाद - काँग्रेसने जमिनीवर यावे, आमच्यासोबत अटी घालत बसू नये असा इशारा भारीप बहुजन महासंघाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिला. बहुजन वंचित आघाडीच्या महिला संघटन बांधणीसाठी रेखा ठाकूर आणि अंजली आंबेडकर शहरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस गेल्या काही दिवसांपासून भारीपसोबत चर्चा करत असल्याच्या बातम्या राज्यभर येत आहे. मात्र, मुळात आमच्यासोबत कुठलीही चर्चा त्यांची सुरू नाही. इतकच नाही, तर आम्ही एमआयएमसोबत गेल्यामुळे काँग्रेसने बरेच आरोप आमच्यावर लावल्याचे ठाकूर म्हणाल्या.
राज्यात लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगला प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादानंतर आता वंचित बहुजन आघाडीने राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. ही तयारी करत असताना काँग्रेससोबत जायचे का, असा प्रश्न भारिप बहुजन महासंघसमोर आहे. याबाबत महिला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांना विचारले असता, अद्याप आमच्यात कुठलीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसने आता जमिनीवर यायला हवे, आमच्यावर कुठल्याही अटी शर्ती त्यांनी लावू नये. आमच्यासोबत येण्याच्या अगोदर त्यांनी आम्ही एमआयएमसोबत गेलो म्हणून आमच्यावर आरोप लावलेत त्याचादेखील स्पष्टीकरण त्यांनी द्यायला हवे.
काँग्रेस आणि भारीप यांच्यात कुठलीही बोलणी सुरू नाहीत. काँग्रेसने आमच्या ज्या जागा आहेत, त्या आम्हाला द्याव्यात. अन्यथा काँग्रेसला भोपळादेखील फोडता येणार नाही अशी खोचक टीका रेखा ठाकूर यांनी केली.