औरंगाबाद : जिल्ह्यातील कन्नड शहरात आज(मंगळवार)पासून कोव्हिड रॅपिड अँटीजेन टेस्टला सुरुवात करण्यात आली. शहरातील क्रीडा संकुल येथील बॅडमिंटन हॉल येथे नगरपरिषदेच्या वतीने आज पहिला टप्पा घेण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कन्नड शहरात आजपासून रॅपीड अँटीजेन चाचणीला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला नागरिकांमध्ये या टेस्टबाबत भीती निर्माण झाली होती. मात्र, नगराध्यक्षांनी पुढाकार घेत स्वत:ची चाचणी करुन घेतली त्यानंतर नागरिकांनी या टेस्टला प्रतिसाद दिला. चाचणीच्या पहिल्या टप्प्यात भाजीमंडीत बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांची टेस्ट करण्यात आली. यात जवळपास १०० भाजीपाला विक्रेत्यांची टेस्ट घेण्यात आली. यानंतर, कन्नडमधील व्यापारी, छोटे मोठे दुकानदार, सलूनचालक, कृषीसेवा चालक, दूध विक्रेते यांची सुद्धा चाचणी करण्यात येईल, असे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, नगराध्यक्षा स्वाती संतोष कोल्हे, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, गटविकासअधिकारी कृष्णा वेणिकर, नगरसेवक अनिल गायकवाड, नगरसेवक रवि राठोड, प्रवीण काशिनंद, डॉ. प्रवीण पवार, तसेच नगरपरिषद कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्तिथ होते.