औरंगाबाद - राजकारणात काहीच अशक्य नसते. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना जर एकत्र येऊ शकतात. तर आम्ही तर समविचारी आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी युतीबाबत सूचक वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले, की शिवसेना व भाजपची 25 वर्षांची युती होती. बाळासाहेब ठाकरे व प्रमोद महाजन यांनी ही युती केली होती. विधानसभेच्या निवडणुकीत युतीला कौल मिळाला होता. मात्र, काही कारणाने ही युती पुन्हा अस्तित्वात आली नाही. शिवसेनेने राष्ट्रवादीवर व राष्ट्रवादीने शिवसेनेवर आरोप केले. तरी ते एकत्रित येऊ शकतात. मग भाजप व शिवसेना हे समविचारी पक्ष का एकत्रित येऊ शकत नाहीत? दोन्ही पक्ष एकत्र आले तर आमचे मतदार खुश होतील, असेही दानवे यांनी सांगितले.
हेही वाचा-...येणाऱ्या काळात कोण सोबत येईल सांगता येत नाही; उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हा परिषद इमारत भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे बघून बदलत्या राजकीय समीकरणाचे संकेत दिले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, की व्यासपीठावर माझे आजी-माजी सहकारी, आणि भविष्यात पुढे पुन्हा एकत्र आले तर भविष्यातील सहकारी. सगळ्यांचे स्वागत असे म्हणाले. त्यामुळे राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे इतकेच बोलले नाही तर रावसाहेब दानवेंकडे पाहत म्हणाले, 'या मुंबईला. बरेच दिवस झाले आला नाहीत'. असे म्हणल्याने राजकीय समीकरण बदलण्याचे संकेत दिल्याने जोरदार चर्चा रंगली आहे. भविष्यात आणि राजकारणात काहीही होऊ शकते. त्याबाबत नंतर कळेलच, असे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिले होते.