कन्नड (औरंगाबाद)- हतनूर येथील युवकाने घरामध्ये छताच्या हूकला दोरी अडकवून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (5 ऑगस्ट) दुपारी एक वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.राजू भिकन येडे (वय३२) या विवाहित युवकाने मंगळवारी (४ ऑगस्ट) रात्रीच्या सुमारास गावातील राहत्या घराच्या छताच्या हूकाला दोरी अडकवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
राखी पौर्णिमेनिमित्त आलेल्या बहिणीने बुधवारी सकाळी फोन केला असता फोन उचलला जात नसल्याने दुपारी घरी येऊन पाहिले. यावेळी दरवाजा उघडला जात नसल्यामुळे ही बाब समोर आली. हतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पार्थिव शरीराचे शवविच्छेदन करुन मृत्तदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राजू येडे याच्या मृतदेहावर साडेचार वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजू येडे याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, तीन भाऊ असा परिवार आहे. भाऊबीजेसाठी आलेल्या बहिणस ओवाळणी देखील करता न आल्याने गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुनिल नेवसे, उपनिरीक्षक बजरंग कुटूंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली. बीट जमादार सतीश खोसरे, रामेश्वर जाधव पुढील तपास करत आहेत.