औरंगाबाद - सरकारने शेतकऱ्यांना अनेक आश्वासन दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. मात्र ती अद्याप पूर्ण केली नाहीत, यामुळे आता त्याबाबत विचार करण्याची वेळ आली असून 5 एप्रिल रोजी कोल्हापूर येथे बैठक घेऊन निर्णय घेऊ, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी ( Raju Shetti ) यांनी औरंगाबाद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिला.
राज्यात सध्या राजकीय टोळी युद्ध - राज्यात अनेक प्रश्न आहेत मात्र त्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही. शिक्षण संस्थांनी गरीब मुलांना पैशांसाठी परीक्षेला बसू दिले नाही. त्यावर कोणी आवाज उठवत नाहीत. कारण अनेक संस्थाचालक सरकारमध्ये तर काही विरोधी पक्षात आहे. त्यावर न बोलता इतर विषयांवरच चर्चा केली जात आहे. त्यामुळे राज्यात राजकीय टोळी युद्ध सुरू असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली.
भाजप अन् राष्ट्रवादी एकाच नाण्याच्या दोन बाजू - उत्तर कोल्हापूरच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठींबा देण्याचा निर्णय अद्याप झाला नाही. महाविकास आघाडी सोबत राहायचे की नाही याचा निर्णय कोल्हापुरात पाच एप्रिला होणाऱ्या बैठकीत घेणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकच नाण्याच्या दोन बाजू असल्याची टीकाही राजू शेट्टी यांनी केली आहे. ऊर्जा विभागाने एकदा श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
हेही वाचा - प्रेमाच्या जाळ्यात ओढून पाच लखाचे सोने लंपास करणारा तरुण अटकेत