वैजापूर (औरंगाबाद) : टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. मात्र १ ते २ रुपये किलो भाव मिळत असल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने शेतातच कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. ही घटना आज (31 ऑगस्ट) सकाळी वैजापूर तालुक्यातील परसोडा येथे घडली. राजु बंकट सिंग महेर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
टोमॅटोला भावच नाही, अखेर...
परसोडा धोंदलगाव शिवारात गट नंबर 548 मध्ये राजू महेर यांची शेती आहे. त्यांनी दोन एकर क्षेत्रावर टोमॅटोची लागवड केली. उत्पादन चांगले झाल्याने महेर कुटुंब आनंदात होते. उत्पन्न चांगले मिळून डोक्यावरचा कर्जाचा भार हलका होईल या उद्देशाने त्यांनी रविवारी टोमॅटो लासूर येथील बाजारपेठेत विक्रीस नेले. मात्र, टोमॅटोस केवळ १ किंवा २ रुपये भाव मिळाला. यामुळे निराश होऊन महेर घरी परतले. आज सकाळी त्यांनी शेतात फवारणीतून उरलेले कीटकनाशक प्राशन केले. त्यांना ताबडतोब उपचारासाठी औरंगाबाद येथे नेण्यात आले. परंतु रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे.
हेही वाचा - राजस्थान - बिकानेरमधील श्री बालाजी गावाजवळ अपघात, 11 जण ठार