औरंगाबाद- दिवाळीच्या खरेदीवर मंदीचे सावट दिसून आले आहे. दिवाळीच्या एक दिवसआधीपर्यंत फटाका बाजारात मंदी दिसून आली. जिल्ह्यात सतत पडणारा पाऊस देखील त्यासाठी कारणीभूत असल्याचे समजले आहे. यावर्षी फटाका व्यापाराला जवळपास ३० ते ४० टक्के नुकसान होईल, अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दिवाळी म्हटलं की फटाका व्यापाऱ्यांची चांदी समजली जाते. मात्र, याच दिवाळीत फटाका व्यापाऱ्यांची दिवाळी निघाल्याचे दिसून येत आहे. दिवाळीच्या चार दिवसा आधी फटाका बाजार सुरू झाला असला तरी, म्हणावी तशी गर्दी अद्याप बाजार पेठेत दिसली नाही. फटाका बाजारात कोट्यवधींचे फटाके येऊन पडले असले तरी अद्याप म्हणावी तशी विक्री होत नसल्याने फटाका व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
सतत पडणारा पाऊस, आणि मंदी त्यामुळे हा परिणाम होत असल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही तर, गेल्या काही वर्षात इको फ्रेंडली दिवाळी साजरा करण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी मोहीम उभारल्या आहे. त्यामुळे फटाका विक्रीवर होणारा परिणाम थांबवण्यासाठी अनेक कंपन्यांनी इको फ्रेंडली फटाके बाजारात आणले. मात्र, तरी देखील त्यांची विक्री मंदावल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. सलग दुसऱ्या वर्षी फटाका व्यापाऱ्यांना मंदीचा फटका बसला असला तरी लवकरच व्यापारात उभारी येईल, असा विश्वास फटाका व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. शहराच्या फटाका बाजारपेठेचा आढावा घेतला आहे.. आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
हेही वाचा- जायकवाडी धरणातून गोदावरीत 51893 क्यूसेक पाण्याचा विसर्ग