औरंगाबाद - कन्नड साखर कारखान्याच्या ८५० कामगारांच्या थकीत पगाराचा मार्ग तब्बल १० वर्षानी मोकळा झाला. कारखाना विक्री केल्यानंतर न्यायालयाच्या निर्णया नुसार पगाराची रक्कम कामगार न्यायालयाकडून तपासून निश्चित करून घेण्यात आली. यावर चर्चा करण्यासाठी सरस्वती कॉलनीतील राधाकृष्ण मंदिरात कामगारांची बैठक संपन्न झाली.
कन्नड साखर कारखाना २००९ मध्ये बंद झाला. या कारखान्यात एकून ९६७ कर्मचारी होते, यातील २०० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या कामगारांचा पगार व इतर देणी बाकी होती. दरम्यानच्या काळात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने थकीत कर्ज वसुलीसाठी हा कराखाना विक्री केला. कामगारांनी पगार मिळविण्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने कारखाना विक्री करून आलेली रक्कम बँकेच्या ने लीन खात्यामध्ये जमा करून ठेवावी व कामगारांनी त्यांचा पगार न्यायालयकडून तपासून निश्चित करून घ्यावा, असे आदेश दिले.
यानंतर कामगार संघटनेने कामगार न्यायालयात पगार निश्चितीसाठी प्रकरण दाखल केले होते. त्यानुसार कामगार न्यायालयाने तीन जानेवारी २०२० ला पगाराची रक्कम तपासून निश्चित केली आहे. थकीत पगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावर चर्चा करण्यासाठी कामगारांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते, साखर कामगार संघटनेतर्फे अॅड. कृष्णा जाधव, लालमियाँ शहा, व्ही. एन. पाटणी, कृष्णा मोहिते, पी. के. चव्हाण, आर. व्ही. वशदे, टी. एस. चव्हाण, गंगा सूर्यवंशी, तसेच मोठया संख्येने साखर कामगार उपस्तिथ होते.