औरंगाबाद - दोन महिन्यांपूर्वी झालेल्या चंदन चोरी प्रकरणात पोलिसांनी एका सराईत गुन्हेगाराला पुंडलिकनगर भागातून अटक केली. अनिल उर्फ साहेबराव पुंगळे (वय-३२, रा. मिटमिटा) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून 30 किलो चंदनाचे लाकूड जप्त करण्यात आले आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेने ही कारवाई केली.
दोन महिन्यांपूर्वी गारखेडातील छत्रपती नगर भागात राहणाऱ्या निशांत ओमप्रकाश चांद्रमोरे यांच्या घराच्या अंगणातून चंदनाच्या झाडाची चोरी झाली होती. चांद्रमोरे यांनी याबाबत पुंडलीकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. आरोपी अनिल पुंगळे हा पुंडलिकनगर भागात चोरलेले चंदन विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्ष सोनवणे यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी अनिलला ताब्यात घेतले.
आरोपीची कसून चौकशी केली असता त्यानेच चांद्रमोरे यांच्या अंगणातील चंदनाचे झाड चोरल्याची कबुली दिली. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांचा मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पी. आर. सोनवणे, हेड कॉन्स्टेबल रमेश सांगळे, पोलीस नामदार बाळाराम चौरे पोलीस शीपाई जे. बी. माटे यांनी केली.