औरंगाबाद - नागरिकत्व (सुधारणा) कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद शहरातही उमटले. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात सीएए विरोधात महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला आझाद चौकातून सुरुवात झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका जाहीर केली होती आणि नव्या कायद्याचा निषेध करत मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. दुपारी एकच्या सुमारास आझाद चौक येथून महामोर्चाला सुरुवात करण्यात आली. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. याचेच पडसाद शहरातही उमटले. एमआयएमतर्फे निघालेला महामोर्चा रोशन गेट, चंपा चोक, बुढी लाईन, भडकल गेट, दिल्ली गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. यावेळी तिरंगा झेंडा घेऊन मुस्लिम बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.
हेCAA : हिंसा झाल्यास आम्ही सरकारला विरोध करण्यापासून बाजूला होऊ - ओवेसीही वाचा -
हा कायदा मुस्लिम विरोधी आहे आणि तो रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली. भाजप सरकारकडे केंद्रात बहुमत आहे. त्या जोरावर त्यांनी देशाचा विकास करण्याऐवजी समाजात द्वेष पसरवण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. विशेषतः मुस्लिम समाजाला लक्ष करण्याचे काम सरकार करत आहे. नव्या नागरिकत्व कायद्यामुळे देशातील मुस्लिम भयभीत झाला आहे. नागरिक आपल्या नागरिकत्वाचे कागदपत्र जमा करण्यासाठी धावपळ करत आहेत. मुस्लिम बांधवांनी कागदपत्र नसतील तर ते कसे आणायचे, असा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला.