वैजापूर ( छत्रपती संभाजीनगर) : भाजपा सरकार व उद्योगपतींनी मणिपूरमधील वन जमिनीतील खनिज संपत्तीचा ताबा मिळवण्यासाठी दोन समूहात या हिंसाचार भडकावल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. वैजापूर तालुक्यातील मन्याड खोऱ्यातील पाराळा येथे लोक पर्याय सामाजिक संस्थेच्या वतीने क्रांतीकारक तंट्या भिल्ल यांच्या स्मारकाचे बुधवारी लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
सरकार खनिज मफियाला बळी : ॲड. आंबेडकर म्हणाले, ब्रिटिश राजवटीत आदिवासी समूहाने त्यांचे वर्चस्व गुलामी न स्वीकारल्यामुळे इंग्रजांनी त्यांना वनक्षेत्राबाहेर येऊ दिले नाही. ब्रिटिशांचे गुलाम झालेले लोक आपल्याला देशभक्ती शिकवत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. केंद्र सरकार खनिज मफियाला बळी पडलेले आहे, असे ते म्हणाले. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यात अनेक सुप्रसिद्ध अभिनेते, क्रिडापटूंनी जमीनी घेतल्याचा गौप्यस्फोट कार्यक्रमात बोलताना त्यांनी केला.
सामाजिक हिंसाचार निर्माण केल्याची टीका : पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती अदानी दोघेही जिवलग मित्र आहेत. या दोघांवर १९६८ मध्ये एका प्रकरणात संयुक्त गुन्हा दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले. मणिपूर येथील जंगलात अत्यंत महागडा असा प्लॅटिनम धातू आढळून आला आहे. त्यांचा ताबा घेण्यासाठी याठिकाणी सामाजिक हिंसाचार निर्माण केल्याची टीका त्यांनी केली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात लोक पर्याय सामाजिक संस्थेच्या प्रमुख मंगलताई खिंवसरा यांनी वैजापूर तालुक्यातील दुर्गम डोंगराळ अदिवासी पट्ट्यातील अदिवासी कुंटुंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली.
आदिवासी समाज बांधव उपस्थित : या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सिध्दार्थ तेजाड, गौतम जाधव, बाजार समितीचे संचालक प्रशांत त्रिभुवन, नगरसेवक राजेश गायकवाड, गोरख आहेर, वसंत पवार, जाकीर पठाण, अंकुश पठारे, चंद्रसेन भोसले, राजवीर त्रिभुवन, अशोक तांबूस, लक्ष्मण धनेश्वर, यशवंत पडवळ, मनोज पठारे, अमोल दिवे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी मंचावर अंजली आंबेडकर, वंचितचे प्रवक्ते दिशा शेख, सामाजिक कार्यकर्ते शांताराम पंदेरे, आनंदी अन्नदाते, लोक पर्याय संस्थेच्या प्रमुख मंगला खिंवसरा व एकनाथ बागुल यांची उपस्थिती होती.
हेही वाचा :
- Challenge To Sedition Act : एल्गार परिषद प्रकरणात याचिककर्त्याला नोटीस दिल्याने देशद्रोहाच्या कायद्याला प्रकाश आंबेडकरांनी दिले आव्हान
- Prakash Ambedkar On Aurangzeb : औरंगजेबाचे उदात्तीकरण केले तर त्यात वाईट काय? प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न
- Prakash Ambedkar : 'वंचित' भाजपसोबत जाणार? प्रकाश आंबेडकरांनी थेटच सांगितले....