छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : पोलीस म्हटले तर त्यांची एक वेगळी प्रतिमा आपल्या नजरेसमोर उभे राहते. खाकी गणवेशात, शिस्तबद्ध असलेला आणि इतरांना शिस्त लाऊन रक्षण करणारा व्यक्ती म्हणजे पोलीस असे आपल्याला नेहमीच वाटते. मात्र सध्या समाज माध्यमांवर एका पोलिसाची चर्चा होत आहे. ती त्यांच्यातील कलेमुळे होत आहे. पोलीस विभागातील शस्त्र शाखेत कार्यरत असलेले प्रल्हाद शेळके यांच्या बासरी वादनाने अनेकांना भुरळ घातली आहे.
दुर्घटनेनंतर निर्माण झाली आवड : पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद शेळके सध्या छत्रपती संभाजीनगर येथील शस्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 1988 साली ते पोलीस विभागात भरती झाले. 1992- 93 च्या काळात रायफल दुरुस्त करत असताना त्यातला एक भाग छातीला आणि तोंडाला लागून ते जखमी झाले होते. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांना श्वास घेताना अनेक अडचणी येत असल्याने डॉक्टरांनी त्यांना फुगे फुगवण्याचा व्यायाम करण्यासाठी सांगितला. तो करत असताना आपल्याला बासरी वाजवण्याची आवड आहे. ती वाजवली तर चालेल का अशी विचारना केली. त्यावर डॉक्टरांनी त्यांना संमती दिली, त्या वेळापासून त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने प्रशिक्षकांकडून बासरी वाजवण्याचा प्रशिक्षण घेतले. आपल्या छंदाला वाट मोकळी करून दिली. आज संगीत विशारद म्हणून त्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केला.
शेळके यांनी घेतले उच्च शिक्षण : शिपाई पदावर भरती झाल्यावर बासरी वाजवण्याची आवड त्यांनी जपली. पोलीस बँड पथकातील त्यांच्या मित्राने प्रेरणा देत त्यांना संगीत शिकण्याचे प्रोत्साहन दिले. प्रल्हाद शेळके यांना शिक्षणाची आवड आहे, आपली नोकरी सांभाळत त्यांनी इंग्रजी विषयात एमफिल आणि पीएचडी पूर्ण केली. तर संगीतात त्यांनी शिक्षण घेत संगीत विशारद उपाधी घेत पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. आता संगीतात एमए पदवी घेण्यातही त्यांचा अभ्यास सुरू आहे. रोज सकाळी उठल्यावर पाहिले बासरी वाजवत आपल्या दिवसाची सुरुवात ते करतात. तर रात्री वेळ भेटला तर आणखी सराव करून ते आपला दिवस संपवतात. बासरी म्हणजे माझा श्वास आहे अशी भावना, प्रल्हाद शेळके यांनी व्यक्त केली.
ताण तणाव होती कमी : पोलीस विभागात नेहमीच ताण तणाव जाणवत असतो, मात्र आपला छंद जोपासला तर त्यातून ताण तणाव निश्चित कमी होईल असा विश्वास प्रल्हाद शेळके यांनी व्यक्त केला. पोलिसात काम करताना अनेक प्रसंगात मानसिक तणाव जाणवत असतो. त्याचा परिणाम सार्वजनिक जीवनात नेहमीच होतो. त्यामुळेच बासरीच्या माध्यमातून तो तणाव दूर करून निरोगी आरोग्य जगण्यासाठी प्रयत्न करतो. हाच संदेश पोलीस विभागातील अनेक कार्यक्रमात आपण देत असतो. आज मी माझा छंद जोपासला तो फक्त पोलीस विभागाने सहकार्य केल्यामुळेच. त्यामुळे मी पोलीस विभागाचा नेहमी ऋणी राहील अशी भावना शेळके यांनी व्यक्त केली. इतकेच नाही तर पोलीस आयुक्त पदी संजीव कुमार यांची नियुक्ती असताना स्वतः संगीत बद्ध केलेली "मेरा जीवन बासरी" ही सीडी प्रसिद्ध करण्यात आली. त्यात असलेल्या संगीतामुळे अनेकांचा ताण निश्चित दूर होईल असा विश्वास देखील प्रल्हाद शेळके यांनी व्यक्त केला.
सोशल मीडियावर वाढतोय प्रतिसाद : आजच्या आधुनिक युगात सोशल मीडियावर आपली कला सादर केली जाते. तसाच एक प्रयत्न प्रल्हाद शेळके यांनी केला. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी बासरीचे स्वर मोबाईल कॅमेऱ्यात कैद करत आपल्या सोशल मीडिया पेजवर ते प्रसारित केले. त्याला आता चांगला प्रतिसाद मिळाला, इतकच नाही तर अनेक जण आम्हालाही बासरी शिकवा अशी विनंती केली. बासरी सोबत अन्य वाद्य देखील ते उत्तम वाजवतात. संगीताची साधना हेच आयुष्याचे अंतिम ध्येय असेल असे मत प्रल्हाद शेळके यांनी व्यक्त केले.
हेही वाचा -