औरंगाबाद - मद्यविक्रीवर निर्बंध घातल्यामुळे अनेक भागांत अवैध दारूविक्री सुरू आहे. पोलीस कारवाई देखील करत आहेत. मात्र, पुंडलीकनगर भागात पोलीसच अवैध दारू विक्रेत्याकडून दारूची बाटली घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गस्त घालत असतानाच हा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला. अवैध विक्री रोखण्याची जबाबदारी असलेले पोलीसच असे कृत्य करत असल्याने पोलीस यंत्रणेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
मोबाईलमध्ये झाली घटना कैद
पुंडलीकनगर भागात खांद्यावर काळी बॅग घेऊन दोन तरुण रस्त्यावर थांबतात. शहर पोलीस दलाची एक मोबाइल व्हॅन त्यांच्या जवळ येऊन थांबते. त्या वाहनातील चालकाच्या बाजूला बसलेला डोक्याला पांढरा रुमाल, डोळ्यावर काळा चष्मा घातलेला एक पोलीस कर्मचारी एकाला इशारा करतो. त्या दोन तरुणांना इशारा कळताच ते तरुण खांद्यावरील ती काळी बॅग काढतात व त्यामधून एकजण दारूची बाटली काढतो व ती बाटली कर्तव्यावर असलेल्या त्या पोलिसाला देतो. ही सर्व घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
हेही वाचा - दोन चिमुकल्यांना तिसऱ्या मजल्यावरून फेकून आईचा आत्महत्येचा प्रयत्न, मुलाचा मृत्यू