औरंगाबाद : राज्यभरात गाजलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील कचनेर येथील जैन मंदिर चोरी प्रकरणाचा ( Jain temple theft case ) पोलिसांनी खुलासा केला आहे. मंदिरातील सेवेकरीच चोर निघाल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली. मुख्य आरोपीसह एकाला मध्यप्रदेशमधून अटक ( Police arrested accused from Madhya Pradesh ) करण्यात आली आहे. मंदिरातील दोन किलोची सोन्याची मूर्तीची अदलाबदल करून, त्यातून आलेल्या पैश्यातून आरोपी यांनी स्वतःवरील कर्ज फेडल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
दोन सेवेकरी अटकेत : अर्पित नरेंद्र जैन (वय 32 वर्ष रा. शिवपुरी जि. गुणा,मध्यप्रदेश) आणि अनिल भवानीदिन विश्वकर्मा (वय 27 वर्ष रा. शहागड जि. सागर, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या सेवेकरी आरोपींचे नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कचनेर येथील जैन मंदिरातील चोरी प्रकरणी चिखलठाणा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता पोलिसांचे वेगवेगळे पथ नेमण्यात आले होते. यावेळी परिसरातील सीसीटीव्ही आणि तांत्रीक विश्लेषणावरुन ही चोरी अर्पित नरेंद्र जैन याने केली असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झाले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यप्रदेशात जाऊन अर्पित नरेंद्र जैन याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपला साथीदार अनिल भवानीदिन विश्वकर्मा याच्या मदतीने सोन्याच्या मूर्तीची अदलाबदल केल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोने विकून कर्ज फेडले : यातील मुख्य आरोपी अर्पित जैन याने सुरवातीला आपला साथीदार अनिल भवानीदिन विश्वकर्मा याच्याकडून पितळाची हुबेहूब मूर्ती बनवून घेतली. त्यानंतर एका दिवशी संधी मिळताच सोन्याची मूर्ती काढून त्या जागी पितळाची मूर्ती ठेवली. पुढे चोरलेल्या सुवर्ण धातूच्या मुर्तीचे इलेक्ट्रीक कटर व हातोडयाच्या सहाय्याने तुकडे केले. त्यापैकी काही तुकडे हे मध्यप्रदेशमधील सराफास विक्री करून, आलेल्या पैशातून सोन्याचे दोन शिक्के खरेदी केल. तसेच काही रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरली असल्याची देखील माहिती पोलिसांनी दिली आहे.
असा मुद्देमाल जप्त केला : मुर्तीचे 87, 56, 195/- रुपये किंमतीचे 1604.98 ग्रॅम सोन्याचे तुकडे, 6, 29, 302/- रुपये किंमतीचे सोन्याचे 100 ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, 02 ग्रॅम वजनाचे व 01 ग्रॅम वजनाचे सोच्याचे दोन शिक्के असे एकुण 1706.98 ग्रॅम सोने एकुण किंमत 93,85,497 रुपये व 70,000 रुपये रोख रक्कम, 32,300 रुपये किंमतीचे दोन मोबाईल हॅन्डसेट व सुवर्ण मुर्तीचे तुकडे करण्यासाठी वापरलेले एक इलेक्ट्रीक कटर, 03 लहान मोठया हातोडया, 01 लोखंडी पकड, 01 व्हेक्सा ब्लेड कटर, 01 छोटा इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त केला आहे.