औरंगाबाद : काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यातील दोन उच्चशिक्षित तरुणांनी दारू पिण्यासाठी औरंगाबाद शहरातील कॅनाॅट परिरसरात येऊन चोरी (Theft in Connaught area) केली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून चोरट्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना सिडको पोलिसांसमोर हजर केले आहे. त्यापैकी एकाला त्याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी महागडी स्पोर्ट्स बाईक दिली होती. घटनेच्या रात्री फिरायला बाहेर पडून शहरात येऊन चोरी केल्याची माहिती सिडकोचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.
मोबाईलचे दुकान फोडले : शहरातील कॅनॉटमध्ये रेणुका टेलिकॉम अँड मल्टी सर्विसेस (Renuka Telecom and Multi Services) नावाचे मोबाईल दुकान आहे. त्याचे मालक ज्ञानेश्वर खर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 जुलै रोजी नियमितपणे रात्री मोबाईलचे दुकान बंद करून ते घरी गेले होते. यावेळी दुकानांमध्ये चाळीस हजार रुपये रोकड, दहा स्मार्ट वॉच, 10 येअर बर्ड्स, कीपॅड मोबाईल, पाच चार्जर असा तब्बल 95 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. दुकानात चोरी झाल्या प्रकरणी 30 जुलै रोजी सिडको पोलिस ठाण्यामध्ये खर्डे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा सी.सी.टि.व्ही देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे सर्वत्र प्रसारित झाला. त्यामुळे आरोपींची माहिती मिळाली. अभिषेक राजू रिंढे (वय 21), आदित्य सुनील उघडे (वय 19) राहणार इंदेवाडी जालना असे आरोपींची नावे आहेत. अभिषेक आयटीआयचे शिक्षण घेतो. त्याचे वडील कंपनीत नोकरीला आहेत. तर, आदित्य हा डी फार्मसीचे शिक्षण घेत आहे. त्याचे वडील कंत्राटदार आहेत.
पालकांनीच आणले पोलिसात : या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर थेट जालना जिल्ह्यातील चोरट्यांच्या आई-वडिलांपर्यंत पोहोचले. चोरी करणारे दुसरे तिसरे कोणी नसून आपलीच मुले असल्याचे त्यांना दिसून आले. त्यामुळे या घटनेने पालकांना धक्काच बसला. त्यात पोलिसांनी देखील पूर्ण माहिती काढली. पालकांशी संवाद साधला असता, दोन्ही मुलांच्या पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन विचारपूस केली यावेळी मुलांनी चूक झाल्याची कबुली दिली.
दारूच्या नशेत केले कृत्य : चोरीच्या आरोपात पकडण्यात आलेले दोन्ही युवक उच्चशिक्षित आहेत. दारूच्या नशेत त्यांनी शहर गाठले. कॅनॉट परिसरात मोबाईल दुकानाचे कुलूप तोडून चोरी केली. चोरी झाल्यानंतर जालन्याला परत जात असताना रस्त्यात नाकाबंदी सुरू असल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळेच चोरीचा मुद्देमाल रस्त्यात त्यांनी दडवून घर गाठले. पोलिसांनी अटक केल्यानंतर सर्व मुद्देमाल त्यांनी काढून दिला. या घटनेत पुढील तपास सिडको पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली.