औरंगाबाद - जिल्ह्यातील 'आदर्श गाव' अशी ओळख असलेल्या पाटोदा गावाच्या राजकारणात भूकंंप झाला आहे. तीस वर्षे पाटोद्याच्या ग्रामपंचायतीत एक हाती सत्ता असलेले भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलचा निवडणुकीत धुव्वा उडाला. त्यांच्या मुलीलाही या निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले. ग्रामपंचायत निवडणुकीचा हा निकाल भास्करराव पेरे पाटलांना धक्का देणारा ठरला.
पेरे पाटलांच्या पॅनलचा धुव्वा...
ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जसजसे लागू लागले तसे धक्कादायक निकाल समोर येत आहेत. अनेक दिग्गजांना धक्का देणारे निकाल यंदा पाहायला मिळाले. पाटोदा ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून या निकालाने भास्करराव पेरे पाटलांना धक्कादायक निकालाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत त्यांच्या पूर्ण पॅनलचा धुव्वा उडाला आहे. आदर्श गाव पाटोद्यात सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पॅनेलला पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. पेरे यांच्या मुलीसह तीन जागी पेरे पाटलांचे उमेदवार पराभूत झाले आहेत.
८ जागा आधीच बिनविरोध विरोधी पॅनलकडे...
पाटोदा ग्रामपंचायतीत ११ सदस्य असून ८ जागा पेरे पाटलांच्या विरोधी पॅनेलने आधीच बिनविरोध मिळवल्या होत्या. तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भास्करराव पेरे पाटलांच्या पॅनेलचे तीनही उमेदवार पराभूत झाले आहेत. पाटोदा ग्रामपंचायतीच्या ११ पैकी ११ जागा कपिंद्र पेरे पाटील यांच्या पॅनेलच्या ताब्यात गेल्या आहेत. त्यामुळे आता पाटोदा गावात तीस वर्षांनंतर नवा सरपंच आणि नवे कारभारी पाहायला मिळणार आहेत.