वैजापूर (औरंगाबाद) - विद्यार्थ्याला शाळेतून घरी पाठवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषद शिक्षकाला मारहाण करण्यात आल्याची घटना शुक्रवारी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील गोयगाव येथे घडली आहे. भगवान सोपान सोनवणे असे आरोपी पालकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी गोयगाव जिल्हा परिषद शाळेतील येथील शिक्षक योगेश देवाराम गवळी हे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती संदर्भात शाळेचे अधिकृत काम करीत होते. त्यावेळी भगवान सोनवणे अचानक शाळेत आले व शिक्षक गवळी यांच्याशी मोठ्या आवाजात वाद घालू लागले.
माझ्या मुलाला शाळेतून घरी का पाठवले असा जाब विचारत सोनवणेने, गवळी यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्याच्या उत्तरात शिक्षक गवळी म्हणाले की, सरकारने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत न जाण्याचे आदेश दिले आहेत. याकडे भगवान सोनवणेने दुर्लक्ष करून शिष्यवृत्तीची कागदपत्रे फेकून शिक्षक गवळी यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर मारहाण करत हात-पाय तोडून ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीने फिर्यादीत नमूद केले आहे. या संबंधी वैजापूर पोलीस ठाण्यात कलम 353 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - शॉर्ट सर्किटमुळे 2 एकर ऊस खाक, महावितरणवर भोंगळ कारभाराचा आरोप
हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराज की जय! गंगापूरमध्ये भव्य मिरवणूक काढत अश्वारूढ पुतळ्याची स्थापना