छत्रपती संभाजीनगर : Panther Sena Beat ABVP Workers : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्रूपीकरण केल्याचा आरोप करत पँथर सेनेच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. विद्यापीठात अनेक महापुरुषांच्या नावानं वेगवेगळे अभ्यासक्रम चालवले जातात. त्यासाठी तसे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं जवळपास सगळ्या फलकांवर एबीव्हीपी असं लिहिल्यानं वादाला तोंड फुटलं. त्यामुळं कॅन्टीनमध्ये बसलेल्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आलीय.
दोन दिवसांपासून सुरू आहे विर्दुपीकरण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं असलेल्या या विद्यापीठात चांगलं शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न केले जातात. मात्र, अनेक वेळा इथं सुरू असलेल्या राजकारणामुळं शिक्षण सोडून इतर बाबतीत मोठी चर्चा घडते. तसाच एक प्रकार गेल्या दोन दिवसापासून विद्यापीठ परिसरात होताना पाहायला मिळाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आपल्या संघटनेची मार्केटिंग करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी स्प्रेच्या माध्यमातून नावं लिहिण्याचा सपाटा लावलाय. इतकंच नाही तर, ज्या ठिकाणी महापुरुषांच्या नावानं असलेल्या विभागाचे फलक आहे, त्याच फलकांवर अभविप, एबीव्हीपी अशा नावाने स्प्रे पेंटिंग करण्यात आले आहे. विद्यापीठाची मुख्य इमारत, तसेच विविध विभागाच्या फलकावर नाव लिहण्यात आले आहे. त्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलंय. यावरुन आंबेडकरी संघटनांनी आक्षेप नोंदवत अभाविपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.
पँथर सेनेने केली मारहाण : गेल्या दोन दिवसांपासून विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्प्रेच्या माध्यमातून आपली मार्केटिंग करत आहे. त्यावर अनेकांनी आक्षेप घेत असं करण्यास मनाई केली. मात्र, त्यांनी सदरील प्रकार सुरूच ठेवला, त्यात महात्मा फुले यांच्या नावाचा फलक असलेल्या ठिकाणी स्प्रेनं नाव लिहिल्यामुळं दलित संघटना आक्रमक झाल्या. पँथर सेनेनं अभाविपच्या कार्यकर्त्यांना गाठून जबर मारहाण केली, असे प्रकार थांबले नाही, तर धडा शिकवू अशी तंबी त्यांनी दिली. तर विद्यापीठ प्रशासनाला असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असे निवेदन यावेळी देण्यात आले. विद्यापीठ शिक्षणाचे घर आहे, ते चांगलं, स्वच्छ असणं गरजेचं आहे. दरवर्षी त्यासाठी कोट्यावधी रुपये रंग कामावर खर्च केले जातात. त्यात अशा पद्धतीनं संघटना स्वतःची मार्केटिंग करण्यासाठी विद्रूपीकरण करणार असेल तर, विद्यापीठात नेमकं चाललं काय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय.
हेही वाचा -